अवैधरित्या मुरूम उपसा; जेसीबी पोकलेनसह जप्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर : रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या मुरूम उपसा करणारी दोन यांत्रिक उपकरणे ताब्यात घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी ठेेकेदार महेश गुंदेचा यांची मुरूम चोरी उघडकीस आणली.

सध्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वनकुटे ते तास या रस्त्याचे काम सुरू असून या कामाच्या दर्जाबाबत अनंत तक्रारी करण्यात येत आहेत.

या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या मुरुमाची रॉयल्टी भरण्यात आली नसल्याची तक्रार तहसीलदार देवरे यांच्याकडे करण्यात आल्यानंतर स्वतः देवरे यांनी वनकुटे येथे भेट देऊन पाहणी केली.

या वेळी ठेकेदाराकडे शासनाकडे रॉयल्टी जमा करण्यात आलेली कोणतीही कागदपत्रे उपलब्ध होऊ शकली नाही. तहसीलदारांनी एक पोकलेन, एक जेसीबी जप्त केला. हा मुरूम वाहणारा डंपर (एमएच १६-७७९९) मात्र पळवून नेण्यात चालक यशस्वी झाला.

तहसीलदारांनी कारवाई केल्यानंतर ठेकेदार गुंंदेचा यांनी वनकुटेचे सरपंच  राहुल झावरे यांनी आपणास बेकायदेशीर मुरूम उपसा करण्यास सांगून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु तहसीलदार देवरे यांनी मात्र, कारवाईवर ठाम राहून दोन्ही उपकरणे तहसीलच्या ताब्यात घेण्यात आली.

सरपंच राहुल झावरे यांनी आपला या कामाशी काहीही संबंध नसून ठेकेदार गुंदेचा हे प्रशासनाची दिशाभूल करीत असल्याचा खुलासा केल्यानंतर गुंदेचा यांचा बनाव उघड झाला.

दरम्यान, ठेकेदार गुंदेचा यांनी तालुक्यात केलेल्या विविध कामांसंदर्भात अनेक तक्रारी असून त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विविध गावांच्या नागरिकांकडून करण्यात आली.

अनेक ठिकाणी महसूल तसेच वनखात्याच्या मालकीच्या जमिनींमधून ठेकेदार गुंदेचा यांनी मुरूम, माती तसेच दगडांचे बेकायदा उत्खनन केेले असून शासनाच्या लाखो रुपयांच्या रॉयल्टीस चुना लावल्याच्याही तक्रारी आहेत. सर्व कामांची चौकशी करून रॉयल्टी वसूल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आली.

Leave a Comment