BreakingMaharashtra

पंकजा मुंडे देणार भाजपला सोडचिठ्ठी ?

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि सत्तास्थापनेत अपयश आल्याने भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बोचरी टीका केली असतानाच आता माजी मंत्री पंकजा मुंडे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

रविवारी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर कार्यकर्त्यांना भावनिक पोस्ट लिहीत १२ डिसेंबर रोजी पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले. पंकजा मुंडेंच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.


निवडणुकीमध्येही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना पराभवाचा सामना करायला लागला. यामध्ये माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनाही त्यांच्या हक्काच्या परळी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीच्या निकालानंतर नाराज असलेल्या पंकजा यांनी आपल्या भावनांना फेसबुक पोस्टद्वारे मोकळी वाट करून दिली. 

यामुळे पंकजा भाजपाला सोडचिठ्ठी देऊन वेगळा विचार करणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. यामध्ये पोस्टमध्ये पंकजा म्हणाल्या की, नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे. निवडणुका झाल्या. निवडणुकीचे निकालही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण पाहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला आणि विनंती केली की, कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. 

सर्व जबाबदारी माझी आहे. दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. ‘आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:,’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत.

जनतेप्रति आपल्या कर्तव्यापेक्षा मोठे काहीही नसते, असे मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेले आहे. त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या मृत्यूनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले. पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला मेसेजेस केले, फोन केले, निरोप दिले. ‘ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,’ ‘ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या ‘ किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली. मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे.

मला याची पूर्ण जाणीव आहे की, तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं, एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रति असलेली जबाबदारी म्हणून राजकारणात राहिले. 

आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करून आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण माझ्याकडे वेळ मागत आहात, मी आपल्याला वेळ देणार आहे. आठ ते दहा दिवसांनंतर. हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो?

आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी १२ डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. १२ डिसेंबर, लोकनेते मुंडेसाहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त. 

जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांविषयी बोलतेय. तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे. नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? १२ डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू. येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की, असे त्यांनी म्हटले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button