गोव्यात राजकीय भूकंप घडविण्याचे वृत्त राष्ट्रवादीने फेटाळले ! 

पणजी : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर ‘शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी’ने एकत्रितपणे सरकार बनवीत नवा सत्ताप्रयोग केला आहे; परंतु महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप गोव्यात घडणार नाही, असा दावा करीत या संबंधित वृत्त राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाओ यांनी रविवारी फेटाळून लावले आहे.

गोव्यात भाजपने घोडेबाजार करून सरकार बनविले आहे. लवकरच हे सरकार कोसळेल, अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी नुकतीच केली होती. गोव्यातसुद्धा भाजप वगळून सर्व पक्ष एकत्र येतील, असा दावा त्यांनी केला. मात्र, गोव्यात असा प्रकार अजिबात घडणार नाही, असे आमदार चर्चिल अलेमाओ यांनी स्पष्ट केले आहे.
Loading...
ते दक्षिण गोव्यात पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सध्या गोव्याचे कामकाज उत्तमरीत्या हाताळत आहेत. गोव्यातील एका मोठ्या वर्गाचे ते प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे गोवा सरकारमध्ये परिवर्तन होईल, असे म्हणणे चुकीचे असल्याचे अलेमाओ यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपणास कोणतीही बिगरभाजप आघाडी स्थापन करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. यदाकदा तसे निर्देश दिले गेलेच तर मी माझी भूमिका पक्षप्रमुखांना कळवेल, असेही अलेमाओ यांनी नमूद केले.

दरम्यान, ४० सदस्यीय गोवा विधानसभेत सध्या भाजपकडे २७ असे संख्याबळ आहे. काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाल्याने राज्यात भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठणे शक्य झाले आहे.