लोणी येथील गोळीबार प्रकरणातील ४ आरोपी जेरबंद

कोल्हार : रविवारी रात्री श्रीरामपूर येथील सात जणांची लोणी येथे आपसात झालेल्या वादातून एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यातील चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

आरोपींना लोणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. येवला व शिरूर येथून सिराज उर्फ सोल्जर अबू शेख (वय २४), संतोष सुरेश कांबळे (वय २८), गाठण उर्फ शाहरूख उस्मान शहा (वय २०, सर्व रा. वॉर्ड नं. २, श्रीरामपूर) व अरुण भास्कर चौधरी (वय २३, रा. लोणी) असे सात पैकी चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वरील संतोष, शाहरुख व सिराज हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरोधात श्रीरामपूर येथे पाच, तर नगर तोफखाना व एमआयडीसी येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. या घटनेची पार्श्वभूमीवर अशी की, रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास वरील सर्व लोणी येथे आले असता त्यांचे आपापसात वाद झाल्याचे समजते.

AMC Advt

त्या कारणावरून फरदीन अब्बू कुरेशी (वय १८, रा. श्रीरामपूर) याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नगर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून व पथके तयार करून एक दिवसात यातील चार आरोपींना शिरूर व येवला येथून ताब्यात घेतले.

सदर कामी नगर जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शिर्डीचे उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरील चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या.