राम शिंदेंनी बांधली विखेंच्या विरोधात माजी आमदारांची मोट ?

नगर: अहमदनगर जिल्हा  भाजपमध्ये आता पर्यंत गांधी – आगरकर दोन गट असल्याची चर्चा होती. पण आता  माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिसरा गट भाजपमध्ये सक्रिय झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच भाजपची  बैठक माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली.

या बैठकीच्या माध्यमातून शिंदे यांनी विखे यांच्याविरोधात नाराजांची मोट बांधल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात सुरू आहे.

AMC Advt

विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का सहन करावा लागला.  पक्षाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे वगळता जिल्ह्यातील विद्यमान आमदार असलेले राम शिंदे, शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे या चार विद्यमान आमदारांना पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याचबरोबर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेले माजी आमदार वैभव पिचड यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ पक्षाच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे, बबनराव पाचपुते व काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे हे तीनच आमदार निवडून आले.

नगर जिल्ह्यातील भाजपच्या दिग्गजांचा पराभव प्रदेशला देखील जिव्हारी लागला होता. त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राम शिंदे यांचा पराभव खुद्द मुख्यमंत्र्यांच्याच जिव्हारी लागला होता.

एकीकडे सत्ता स्थापनेच्या नादात भाजप गुंतलेला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील पक्षाच्या पराभूत आमदारांनी आपल्या पराभवाचे चिंतन सुरू केले होते.

या बैठकीसाठी राम शिंदे यांच्याबरोबरच विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले अकोले मतदारसंघाचे माजी आमदार वैभव पिचड, राहुरी मतदारसंघाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, नेवासे मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी आमदार चंद्रशेखर कदम उपस्थित होते.