Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreakingCivicMaharashtra

सार्वजनिक जागेत कचरा टाकणे पडले महागात झाला तब्बल इतक्या हजारांचा दंड

अहमदनगर :- नगरकरांनो, सावधान! सार्वजनिक जागेत कचरा टाकणे भलतेच महाग पडू शकते. अशा इशारा देणारी कारवाई अनुशासनप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदींनी केली आहे.

सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याच्या कारणावरून द्विवेदी यांनी सीएसआरडी या संस्थेला तब्बल पाच हजार रुपयांच्या दंडाचे फर्मान जारी केले. जिल्हाधिकारी यांनी स्वत:च कचरा टाकताना रंगेहाथ पकडल्याने कारवाई झाली नसती तरच नवल !

याबाबतची अधिक माहिती अशी, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नजीकच दस्तुरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे नगरनिवास हे निवासस्थान आहे. या निवासस्थानातून नगर-पुणे अर्थात स्टेशन रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रस्त्याकडे नगर निवासाचा मार्ग येतो. याच ठिकाणी अपर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा प्रशासनातील उपजिल्हाधिकारी यांची शासकीय निवासस्थाने आहेत.

या परिसराच्या लगतच सीएसआरडी या शिक्षण संस्थेचे कार्यालय व इमारती आहेत. काल बुधवार दिनांक ११ रोजी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी द्विवेदी नगरनिवास परिसरात होते. याचवेळी नगरनिवास परिसरालगत सार्वजनिक जागेत एक व्यक्ती कचरा टाकताना जिल्हाधिकाऱ्यांना आढळली.

चौकशी केली असता, संबंधित व्यक्ती सीएसआरडी या शिक्षण संस्थेचा कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. अधिक चौकशी करून जिल्हाधिकारी यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत संबंधित शिक्षण संस्थेला सार्वजनिक जागेत कचरा टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close