सावधान ! महागडी चारचाकी स्वस्तात देवून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
अहमदनगर :- अत्यंत कमी वापरलेली महागडी चारचाकी स्वस्तात देतो. म्हणून ऑनलाईन गंडा घालणारे रॅकेट सक्रीय झाले आहे.या रॅकेटने अनेकांना गंडा घातला असून, नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही स्वस्तातल्या गाडीच्या अमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
यातील धक्कादायक बाब म्हणजे ऑनलाईन गुन्हेगार स्वत: लष्करात सेवेत असल्याचे भासवत आहेत. संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील एका युवकाला चारचाकी घ्यायची होती.
सोशल मीडियावर मार्केटमध्ये ‘१५ लाख रुपये किंमत असलेली स्कॉर्पिओ ४७ हजार किलोमीटर वापरलेली २०१७ चे मॉडेल’, अशी आकर्षक जाहिरात त्याने वाचली. गाडीची आणखी माहिती घेण्यासाठी त्याने जाहिरातीवर क्लिक केले.
ती लिंक एका वेबसाईटवर ओपन झाली. त्या पेजवर युवकाने मोबाईल नंबर व ई-मेल आयडी देताच एका व्यक्तीने व्हॉट्सॲपवरून त्याच्याशी चॅटिंग सुरू केली.
युवकाने गाडीचे आणखी फोटो टाकण्याची विनंती करताच समोरच्या व्यक्तीने गाडीचे फोटो, स्मार्ट कार्ड, स्वत:चे आधार कार्ड व तो लष्करात सेवा करत असल्याचे सांगत लष्कराच्या वेशातील आयकार्ड पाठविले.
गाडीच्या फोटोबरोबर ओळखपत्र आल्याने फोटोतील गाडी लष्करातील जवानाची असल्याची या युवकाची खात्री पटली. संबंधित व्यक्तीने तो नागपूरच्या नेव्ही एअरपोर्टमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचे चॅटिंगद्वारे सांगितले.
तेव्हा युवकाने गाडी पहायला नागपूरला केव्हा येऊ, असे विचारताच त्या व्यक्तीने ”मिलिटरी एअरपोर्टमध्ये तुम्हाला एंट्री भेटणार नाही. त्यासाठी पास बनवावा लागेल आणि पास बनविण्यासाठी पाच हजार रुपये खर्च येईल, तो तुम्ही मी सांगतो, त्या अकाऊंटला टाका किंवा मी गाडी आणि ड्रायव्हर संगमनेरला पाठवतो.
तुम्ही ट्रान्सपोर्टच्या खर्चापोटी १० हजार रुपये माझ्या अकाऊंटला टाका”, अशी ऑफर दिली. या ऑफरला भुलत युवकाने पहिला पर्याय निवडला. संबंधित व्यक्तीच्या अकाऊंटला पाच हजार रुपये ट्रान्सफर केले.
पैसे ट्रान्सफर झाल्यावर चॅटिंगद्वारे त्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न केला असता तो नंबर लॉक झाला. हे लक्षात येताच युवकाने त्या नंबरला फोन लावला. मात्र, फोन लागला नाही. चॅटिंगमध्ये दिलेल्या आधार कार्डवर कोळपेवाडीचा पत्ता होता.
त्यामुळे कोळपेवाडीमध्ये नातलगांना फोन करून असा कुणी जवान लष्करात सेवेस आहे का, याची माहिती घेतली. मात्र त्या नावाची व्यक्ती कोळपेवाडीत नसल्याचे लक्षात आले. नंतर जे स्मार्ट कार्ड त्याने पाठविले होते, त्या स्मार्ट कार्डवर गाडी श्रीरामपूर आरटीओ ट्रान्सफर झाल्याचे दाखवत होते.
म्हणून युवकाने त्या स्मार्ट कार्डच्या आधारे श्रीरामपूर आरटीओत चौकशी केली असता ती गाडी नाशिकमधील दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असल्याचे व श्रीरामपूर आरटीओत ट्रान्सफर झालेली नसल्याचे उघड झाले.
स्वस्तात महागडी गाडी मिळण्याच्या अमिषाने आपण फसलो, हे लक्षात येताच युवकाला मोठा धक्का बसला. अशाप्रकारे अनेक जण फसले आहेत, पण पोलिसांत तक्रार दिली, तर बदनामी होईल, म्हणून असे ऑनलाईन फसविले गेलेले अनेक जण तक्रार देण्याचे टाळतात. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे फावत आहे.

Leave a Comment