Ahmednagar North

नामदार बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल हे नक्की वाचाच… 

भारत देशामध्ये महाराष्ट्र हे सर्वात विकसीत व आघाडीवर असलेले राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज फुले-शाहू-आंबेडकर याचबरोबर यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा सांगणारा हा प्रांत आहे. या सर्व राष्ट्रपुरुषांच्या तत्त्वांची अंमलबजावणी करत सध्याच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेले नामदार बाळासाहेब थोरात हे या सर्व वीर पुरुषांचे अनुयायी ठरत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. स्वाभिमानी महाराष्ट्र उभा केला. हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकर यांनी सक्षमपणे सांभाळत स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी कृषी व औद्योगिक क्रांतीचा पाया घालून आधुनिक महाराष्ट्र घडवला.

साहित्य, कला, क्रीडा अशा सर्व क्षेत्रात भरीव योगदान दिले. हाच सुसंस्कृत वारसा जपत संगमनेरचे नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांनी १९८५ पासून राजकारणात आपली वाटचाल सुरू केली. महाराष्ट्र मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, रोहयो असे महत्त्वाची विविध पदे त्यांनी भूषवली.

या सर्व काळात उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले निळवंडे धरण पूर्ण केले. मोठमोठ्या बोगद्यांसह कालव्यांची कामे सुरु केली. संगमनेरचा सहकार सक्षमपणे सांभाळतांना राज्यपातळीवर संगमनेरचे नाव अग्रभागी नेले. या सर्व कामांची दखल घेत श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अतिमहत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कायमस्वरुपी सदस्य म्हणून निवड केली.

याचबरोबर गुजरात व हिमाचल प्रदेशामध्ये महत्त्वाची जबाबदारी ना.थोरातांनी सांभाळली. २०१९ हे वर्षे महाराष्ट्र व देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होतेे. एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि काँग्रेस पक्षाचा मोठा दारूण पराभव झाला. अवघा एकच उमेदवार निवडून आल्याने या पक्षातून अनेकांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला.

अशा अवघड परिस्थितीमध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी स्वच्छ व निष्ठावान नेते असलेले नामदार थोरात यांची १४ जुलै २०१९ रोजी प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. अशा अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे ही तारेवरची कसरत होती. मात्र, स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचे चिरंजीव असलेले नामदार बाळासाहेब थोरात मागे हटले नाही.

संकटाच्या वेळी लढायची असते, पळायचे नसते हे ब्रिद वाक्य सांगून त्यांनी सर्वांमध्ये चैतन्य वाढवून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल, असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण केला. अशातच महाराष्ट्रावर मोदी, शहा यांच्या रूपाने दिल्लीवरून तोफा धडकू लागल्या होत्या.

यात ८० वर्षांचे तरूण योद्धे शरदचंद्र पवार मैदानात उतरले आणि त्यांच्या समवेत काँग्रेसचे बाजीप्रभु नामदार बाळासाहेब थोरात मैदानात उतरले. महाराष्ट्रात सर्वत्र झंझावाती प्रचार केला. अडचणीच्या काळामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना ताकद दिली आणि तब्बल पराभवाच्या मानसिकतेतून पक्ष बाहेर काढत पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळून दिल्या. या विजयाबरोबरच २४ ऑक्टोबर २०१९ रोजी सलग आठ वेळेस विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा मान नामदार थोरात यांनी मिळविला असून सध्याच्या विधानसभेत सर्वाधिक काळ प्रतिनिधीत्व करणारे ते एकमेव नेते ठरले.

निकालानंतर राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली. शिवसेनेने प्रस्ताव दिला तर पाठिंबा देण्याचा विचार करू, असे नामदार थोरात यांनी प्रथम सांगितले आणि राजकीय विश्लेषकांचे भंबेरी उडाली. एक महिनाभर झालेला राजकीय वाद सुरू होता. यानंतर श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.

या सरकार स्थापनेमध्ये संगमनेरचे नेतृत्व नामदार थोरात यांचा सिंहाचा वाटा राहिला. प्रसिद्धीपासून चार हात दूर राहत अतिशय चाणाक्षपणे व्यूहरचना त्यांनी केली. आणि तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आले. यामध्ये ते २६ नोव्हेंबर २०१९ रोजी नामदार थोरात यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली, तर २८ नोव्हेंबर २०१९ ला शिवतीर्थावर महाविकास आघाडीचा भव्य शपथविधीत नामदार उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ऐतिहासिकपणे शपथ घेण्याचा मान काँग्रेसकडून नामदार थोरात यांना मिळाला.

पुन्हा एकदा महाराष्ट्राला अपेक्षित होतं, उपमुख्यमंत्रीपद किंवा महसूल विभागाची जबाबदारी नामदार थोरात यांना मिळणार आणि त्याप्रमाणे १२ डिसेंबर २०१९ रोजी नामदार उद्धव ठाकरे यांनी नामदार थोरात यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, अपारंपारिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली. अडचणीच्या काळामध्ये पक्षाला भरारी देणारे हे नेतृत्व म्हणजे काँग्रेसचे खरेखुरे लढवय्ये ठरले आहेत. – नामदेव कहांडळ, देवकौठे (चोरकौठे) संगमनेर.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button