बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार होते !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कॉग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्‍या भेटी बाबतचे वृत्‍त हे माझ्या बदनामीचे षडयंत्र असुन कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याच्‍या चर्चाही निरर्थक आहेत. या विरोधात आपण गुन्‍हा दाखल केला असल्‍याची माहीती माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

कॉंग्रेस पक्ष सोडल्‍यानंतरही आमच्‍या सुखदुखाची चिंता करणारे आमदार बाळासाहेब थोरातच दोन वर्षापुर्वी भाजप मध्‍ये प्रवेश करणार होते असा गौप्‍यस्‍फोट त्‍यांनी केला. यासाठी त्‍यांनी दिल्‍लीत कोणाच्‍या भेटी घेतल्‍या त्‍यांची नावे आता आम्‍हाला जाहीर करायला लावु नका असा इशाराही त्‍यांनी दिला.

माध्‍यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्‍या न झालेल्‍या भेटीची चर्चा जाणीवपुर्वक सुरु करुन मला बदनाम करण्‍याचा काहींचा हेतू आहे. या बदनामीकारक चर्चेच्‍या मुळापर्यंत जाण्‍याचा निर्णय मी घेतला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशअध्‍यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी केलेल्‍या विधानावर भाष्‍य करताना आ‍.विखे पाटील म्‍हणाले की, पक्षाला मिळालेल्‍या यशात थोरातांचे कर्तृत्‍व शुन्‍य आहे. त्‍यांना सर्व अपघाताने मिळाले आहे.

विरोधी पक्षनेता म्‍हणुन केलेल्‍या कामामुळेच राज्‍यात कॉंग्रेसला अच्‍छेदिन आले आहेत. मागील साडेचार वर्षे थोरात गायपच होते. कॉंग्रेसचा राज्‍यात पुर्णपणे फुटबॉल झाला असुन, कॉंग्रेसचे नेतृत्‍व राष्‍ट्रवादी आणि शिवसेनेच्‍या दावणीला बांधले गेले असल्‍याची टिका त्‍यांनी केली.

आ.राधाकृष्‍ण विखे पाटील म्‍हणाले की, सत्‍तेवर येण्‍यापुर्वी या सरकारने सातबारा कोरा करण्‍याचे आश्‍वासन दिले होते. मात्र २ लाख रुपयांच्‍या कर्जमाफीची घोषणेपासुन हे सरकार दुर गेले आहे. सरकारने याबाबतच्‍या काढलेल्‍या परिपत्रकातही मोठ्या प्रमाणात शर्ती आणि अटी घातल्‍या असल्‍याने महाविकास आघाडीच्‍या कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळणार नाही.

त्‍यामुळे ही योजना म्‍हणजे केवळ स्‍वप्‍नरंजन असुन सरकारचा हेतू चांगला नसल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. महाविकास आघाडीच्‍या कर्जमाफी योजनेतुन राज्‍यातील शेतक-यांची फसवणुक झाली असुन, शेतक-यांचा अपेक्षाभंगही केला. मुख्‍यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल वेगळाच असल्‍याने स्‍वत:च्‍या भुमिकेपासुन ते दुर गेल्‍याने त्‍यांना आत्‍मपरिक्षणाची गरज आहे.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेतक-यांच्‍या मदतीबाबत कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीचे आमदारही काही बोलायला तयार नसल्‍याने तुमचा सत्‍तेचा डाव चालु ठेवा मात्र शेतक-यांचा बळी देवू नका असा सल्‍ला माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माध्‍यमांशी बोलताना दिला.

जिल्‍ह्यातील भाजपाच्‍या पराभुत आमदारांकडुन होत असलेल्‍या आरोपांवर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, या संदर्भात संबधितांनी पक्षाच्‍या नेतृत्‍वाकडेच भुमिका मांडायला हवी होती, पक्षाला असलेल्‍या आचारसहींतेचा विचार करुन थेट माध्‍यमांकडे जाण्‍याची गरज नव्‍हती.

याबाबत मी कधीही माध्‍यमांसमोर भाष्‍य केले नाही. आता आमच्‍या सर्वांच्‍याच मागणीवरुन पक्षाचे नेते नामदार देवेंद्र फडणवीस यांच्‍या समवेत मुंबईतील बैठकीत विस्‍तृत चर्चा झाली असुन, नेमलेल्‍या समितीकडुन येणा-या अहवालावर निर्णय होईल असे त्‍यांनी सांगितले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment