Budget 2020: सामान्य माणसाला समर्पित असा अर्थसंकल्प- आ.विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम : “सबका साथ सबका विकास”  या घोषणेला अनुसरून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सामान्य माणसाला समर्पित झालेला असून, शेती, शिक्षण तसेच  आरोग्य यासाठी अर्थसंकल्पात केलेल्या भरीव आर्थिक तरतूदीतून सामाजिक सुरक्षा देण्याच्या केलेल्या प्रयत्नांचे स्वागतच करायला हवे अशी प्रतिक्रीया माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना आमदार विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी येण्यासाठी १६ सुत्री कार्यक्रम  जाहीर केला आहे. ही बाब अर्थसंकल्पात वेगळेपण दर्शविणारी आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना शेतकऱ्यांसाठी झिरो  बजेट शेतीची मांडलेली  संकल्पना शेतकऱ्यांना दिलासा देणारी  आहे.

नाबार्ड अंतर्गत वेअर हाऊस, कोल्ड स्टोअरेज आणि महिलांसाठी धान्य लक्ष्मी नावाने सुरु केलेली योजना आणि जिल्हा स्तरावर फळबाग योजनेला प्रोत्साहन, शेती उत्पादीत मालासाठी किसान रेलची घोषणा ही शेती आणि शेती व्यावसायासाठी आधार ठरेल याकडे त्यांनी  माध्यमांचे लक्ष वेधले.

पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याच्या घोषणेमुळे सामान्य माणसाला या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला असून, बँक खात्यात असलेल्या रक्कमेला ५ लाख रुपयांपर्यंतचे विमा कवच त्यांनी दिल्याने या बाबतची होत असलेली मागणी अर्थसंकल्पातून पूर्ण झाली आहे. शिक्षणासाठी अर्थसंकल्पात ९९ हजार ३०० कोटी रुपयांची तसेच कौशल्य विकास कार्यक्रमासाठी ३ हजार कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूदीमुळे ग्रामीण शिक्षणाचा पाया मजबूत होण्यास मदत होईल. दर्जेदार शिक्षणासाठी १०० संस्थांमध्ये सुरु करण्यात आलेली पदवीस्तरीय ऑनलाईन योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना निश्चितच होईल या माध्यमातून देशात नवे शैक्षणिक धोरण दिशा देणारे ठरेल.

देशातील सामान्य जनतेने निवडणूकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा बहुमताने या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तो विश्वास अर्थसंकल्पातून सार्थ होत असल्याचे विखे पाटील शेवटी म्हणाले.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment