Ahmednagar NewsBreaking

रोजगार व ग्रामीण विकासासाठी शिव महारोजगार व शिवतळे योजना जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्र शासनाने राज्यातील लाखो सुशिक्षीत बेरोजगारांना स्वयंरोजगार देण्यासाठी शिव महारोजगार योजना तर ग्रामीण भागाच्या विकासासाठी शिवतळे योजना जाहीर करण्याची मागणी पीपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेंरा अपना घर आंदोलन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने करण्यात आली. तर घरकुल वंचितांना निवार्‍याचा मुलभूत अधिकार मिळण्यासाठी राज्य सरकारने रुर्बन व्हॅल्यु क्रियेशन अ‍ॅण्ड कॅप्चर पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप स्किम योजना स्विकारण्याचा आग्रह धरण्यात आला.

हुतात्मा स्मारकात झालेल्या घरकुल वंचितांच्या बैठकित सदर मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, पोपट भोसले, अंबिका जाधव, संगिता साळुंके, नजमा शेख, दया देशमाने, सनी गायकवाड, नामदेव अडागळे आदींसह महिला उपस्थित होत्या.

बैठकीच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तर संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आधुनिक जाणते राजश्री अशी राष्ट्रीय मानवंदना देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. महापुरुषांचा आदर्श समोर ठेऊन शरद पवार यांनी जनतेच्या भल्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले.

महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे महत्त्वाचे योगदान असून, त्यांना लवकरच आधुनिक जाणते राजश्री हा सन्मान बहाल करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारने रुर्बन व्हॅल्यु क्रियेशन अ‍ॅण्ड कॅप्चर पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप स्किम योजना स्विकारल्यास घरकुल वंचितांना निम्म्या किंमतीत घरे मिळणार आहेत.

या योजनेसाठी खडकाळ जागा देणार्‍या शेतकर्‍यांचा देखील मोठा फायदा होणार आहे. सरकारला जागा व पैसे न देता फक्त धोरणाची अंमलबजावणी करायची असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी सांगितले. समाजातील दुर्बल व वंचित घटकासाठी कार्य करणारे उबेद शेख यांचा संघटनेच्या वतीने लॉरिस्टर ऑफ इनोव्हेशन गव्हर्नन्स या उपाधीने सन्मान करण्यात आला.

उबेद शेख यांनी घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण लवकरच एक शिष्टमंडळ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन चर्चा करु, तर राज्य सरकारला रुर्बन व्हॅल्यु क्रियेशन अ‍ॅण्ड कॅप्चर पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशिप स्किम योजनेच्या अंमलबजावणीसाठी आग्रह करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर घरकुल वंचितांच्या लढ्यात आपण नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी दर्शवली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button