आ.संग्राम जगताप महाविकास आघाडी धर्म पाळणार की भाजपला पुन्हा बाहेरून ताकद देणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  राज्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला नगर शहरातील पोटनिवडणुकीतही राबवण्यात येत आहे. प्रभाग सहामध्ये एका जागेच्या पोटनिवडणुकीनिमित्ताने शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सोमवारी आमदार जगताप यांच्या कार्यालयात जाऊन चर्चा केली.

दरम्यान, शिवसेना उपनेते अनिल राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते मात्र गैरहजर होते. नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, विजय पठारे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, प्रशांत गायकवाड, माजी उमहापौर अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी शिवसेनेचे नगरसेवकही उपस्थित होते. राष्ट्रवादीचे माणिक विधाते, रेश्मा आठरे, नगरसेवक गणेश भोसले, कुमार वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, सुनील त्र्यंबके, विनित पाउलबुधे, बाबासाहेब गाडळकर, संभाजी पवार डॉ. सागर बोरुडे, विपुल शेटिया, शिवाजी चव्हाण, किरण कटारिया आदी उपस्थित होते.

भाऊ कोरगावकर म्हणाले, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून शहरात विधायक कामे केली जात आहेत. याच धरतीवर नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास शहराचे चित्र बदलणार आहे.

शहराच्या राजकारणात जे झाले, त्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा झाले गेले विसरून एकत्र येऊन विकासाला चालना देण्याची गरज आहे. प्रभाग सहाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने विजयासाठी महाविकास आघाडीचा श्रीगणेशा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. महाआघाडीच्या यशस्विततेसाठी आयोजित या बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते मात्र, गैरहजर होते.

शिवसेनेचे अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीवेळीच समोर आले होते. अंतर्गत गटबाजीमुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार की फसणार यावरच नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दोन्ही गटनेत्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या गटनेत्यांनी एकत्र बसून चर्चा करा.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होणार आहेत. पोटनिवडणुकीत थेट वरिष्ठ नेतेही रस घेत असल्याने निवडणूक रंगात आली आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिल्याने अवघ्या १४ जागा घेणारी भाजप मनपात सत्तेत आहे. राज्याच्या राजकारणात राजकीय समिकरणे बदलल्यामुळे पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी महाविकास आघाडी धर्म पाळणार की भाजपला पुन्हा बाहेरून ताकद देणार हा विषय सर्वाधिक चर्चेत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment