HealthLifestyle

ताणतणाव चांगला की वाईट ?

नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणावाचं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणावात फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत.

वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं. समर्थ रामदास स्वामींनी मनाचं वर्णन ‘अचपळ मन माझे। धावरे धाव घेता..।।’ अशा शब्दात अचूकपणे केलेलं आहे.

क्षणार्धात मैलोन् मैल धाव घेणा-या मनाला लगाम नाही घातला तर मानसिक स्वास्थ्य बिघडतं. शारीरिक व्याधी जडतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, विविध प्रकारच्या गायनॅक समस्या याही मानसिक संतुलन बिघडल्यामुळे जडतात.

मुंबई ही आता मधुमेहींची नगरी समजली जाते. आणि मुख्य म्हणजे मधुमेहाचा आजार तणावामुळे बळावत आहे, असंही काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. पोटाचे विकारही तणावामुळे वाढत आहेत. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक क्षणाला लोकं तणावाचा सामना करतात. पण त्याकडे समजून दुर्लक्ष केलं जातं.

काही प्रमाणात निर्माण होणारा ताणतणाव हा चांगला. जर आपल्याला अगदी उत्तम कार्यपद्धती हवी असेल तर थोडा तणाव आवश्यक आहे. नाहीतर आपण खूपच आळशी होऊ. आपल्याकडून कुठल्याच प्रकारचं भरीव काम होणार नाही.

अतिरिक्त तणाव हा वाईटच. या तणावाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम व्यक्तीला सहन करावे लागतात. म्हणजे जी माणसं सतत हसत-खेळत असतात, त्यांना कुठल्याच प्रकारचा तणाव नसतो, असं म्हणणं चुकीचं ठरेल.

आपल्यावर असणारा तणाव न दाखवता काम करणं ही त्यांची कार्यपद्धती आहे. अर्थात ती चांगली. मात्र ती प्रत्येकाला जमतेच असं नाही.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button