मादी व दोन बछड्यांची होईना भेट,एका बछड्याचा मृत्यू …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आश्वी : तीन दिवस उलटूनही मादी बिबट्या व तिच्या दोन बछड्यांची भेट होत नसल्यामुळे या मायलेकरांच्या भेटीकडे वनविभागासह तालुक्यातील प्राणीप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु, रविवारी उपासमार होत असल्याने एका बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

संगमनेर तालुक्यातील माळेवाडी शिवारातील आश्वी-शेडगाव रस्त्यालगत माजी सरपंच भाऊसाहेब संभाजी मांढरे यांच्या गट नं. २६८ मध्ये ऊसतोडणी सुरू असताना तीन बिबट्याची पिल्ले ऊसतोड मजुरांना गुरुवारी सकाळी सापडली होती.

त्यामुळे त्यांनी याबाबत भाऊसाहेब मांढरे यांना माहिती दिली. मांढरे यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिल्याने वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मादी बिबट्या आपली पिल्ले नेण्यासाठी येईल या आशेवर तीनही बछडे शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवून वनविभाग लक्ष ठेवून होते.

रात्री उशिरा मादी बिबट्या त्या ठिकाणी दाखल झाली. तिन्हीऐवजी एका बछड्याला घेऊन निघून गेली. मादी परत येईल, असे वाटत होते. परंतु, तीन दिवस उलटूनही मादी परत आली नसल्याने अवघे चार ते पाच दिवसांचे वय असलेल्या पिल्लांची उपासमार होऊ लागली.त्यामुळे रविवारी सकाळी वनविभागाने दोन्ही बछडे निंबाळे येथील नर्सरीत हलविले.

परंतु, याठिकाणी एका बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभागाने दिली. दुसऱ्या बछड्याला पुणे येथील बिबटे निवारण केंद्रात पाठविल्याचे सांगितले आहे. 

Leave a Comment