Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

खासदार सुप्रिया सुळे म्हणतात महाविकास आघाडी सरकार 15 वर्षे चालणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीरामपूर :- विकासाच्या माध्यमातून हे सरकार पाचच काय पंधरा वर्षे काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. श्रीरामपूर नगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच पद्मश्री राहीबाई पोपेरे, पद्मश्री पोपट पवार, झहीर खान यांच्यासह शहरातील सामाजिक काम करणार्‍या व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, झहीर खानचे वडील बख्तीयार खान, आई झाकिया खान, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, निर्मला मालपाणी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदिप वर्पे, कपिल पवार, फा.ज्यो. गायकवाड आदी उपस्थित होते.

खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आम्ही येत्या पाच वर्षात राज्याचा खालावलेला लौकिक व आण बाण शान परत मिळवून देणार आहोत. आम्ही द्वेषाचे राजकारण करणार नाही तर विकास करणार आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर खुशाल टीका करावी. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सत्ताकाळात नोकर भरती करण्याऐवजी पक्ष भरती केली. त्यामुळे अनेक युवक बेरोजगार राहिले, असा आरोपही त्यांनी केला.

खा. शरद पवार यांनी महिलांना आरक्षण दिले त्यामुळे महिला उंबरठा ओलांडून बाहेर आल्या आहेत. स्व. आर. आर. आबांनी राज्यात स्वच्छता अभियान सुरु केले. तीच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारली आहे. भाजपाच्या मुख्यमत्र्यांनी राज्याची आर्थिक अधोगती करून ठेवली आहे. राज्याचा नंबर खाली घसरला. त्यामुळे आता आमच्यापुढे राज्याला गतवैभव प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान आहे.

मात्र आम्ही द्वेषाचे राजकारण न करता विकासाचे समाजकारण करणार आहोत. नोकर भरती करुन युवकांच्या हाताला काम देणार आहोत. मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त पक्ष भरती केली. दिल्लीतील केजरीवाल सरकारने विकास केला म्हणून लोकांनी त्यांना पुन्हा संधी दिली. जनतेला जात-पात-धर्म यात अजिबात रस नाही तर विकास हवा आहे, हे दिल्लीच्या निवडणुकीने दाखवून दिले. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबाबत योग्य धोरण तयार करून निर्यातीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Get real time updates directly on you device, subscribe now.