धर्मरक्षक – राजा शिवाजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अतिप्राचीन संस्कृतीचा वारसा असलेला वसुंधरेच्या पटलावरील एकमेव राष्ट्र हिंदुस्थान होते सुमारे चार हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीचे अवशेष मोहेंजोदाडो व हडप्पा या ठिकाणी आढळलेले आहेत. हिंदुस्थानच्या सीमेअंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रम्हदेश ही राष्ट्रे होती. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर अवघ्या पन्नास वर्षात मौर्य साम्राज्याची वाताहात झाली. बौध्द धर्माचा प्रसार उत्तर भारतात / हिंदुस्थानात प्रामुख्याने झाला. पुढे उत्तर हिंदुस्थानात प्रथम कुषाण (इ. स. ६५-२२५) व नंतर गुप्त (३२०-६५०) घराण्यांच्या तर दक्षिण हिंदुस्थानात सातवाहन उर्फ आंध्रभृत्यांच्या सामर्थ्यवान घराण्याची राजवट होती. गुप्त घराण्यातील हर्षवर्धन शिलादित्य याच्या साम्राज्याचे पतन झाले. उत्तर हिंदुस्थानात रजपूत व बिगर रजपूत राजसत्तांचा उदय व विकास ७ ते १२ व्या शतकादरम्यान झाला.

मध्ययुगावर प्रभाव पाडणाऱ्या दोन धर्मविषयक घटना ७ व्या व ८ व्या शतकादरम्यान घडल्या. मलबार प्रदेशात जन्मलेल्या आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकाच्या अखेरीस बौध्द तत्वप्रणाली व हिंदू धर्मप्रणाली बाबत जनजागृती घडवून आणली. हिंदुस्थानात बौध्द धर्माचा प्रभाव कमी होत गेला. हिंदुस्थान खऱ्या अर्थाने हिंदू राष्ट्र झाले.

शंकराचार्यांपूर्वी अरबस्थानात मक्केस जन्मलेल्या महमंद पैगंबरानी (इ.स. ५७० ते ६३२) ‘सेवा-साथी राहणी-बंधुभाव’ अशा विचारसरणीच्या इस्लाम धर्माची स्थापना केली. अरबस्थानात इस्लमाची ख्याती पसरली, पण तुर्कांनी अरबस्थान जिंकून इस्लाम धर्माचा स्वीकार केला. हिंदुस्थानासह आजूबाजूच्या प्रांतात इस्लामचा प्रसार करण्याची जबाबदारीही तुर्कांनी स्वीकारली. धर्मवेडया तुर्कांनी इस्लामचा कडवा प्रसार केला. इस्लाम धर्मप्रसाराच्या बुरख्यासह गझनीचा सुलतान महंमद याने इ.स. १००० ते १०२७ दरम्यान हिंदुस्थानावर १८ स्वाऱ्या केल्या. आपल्या स्वाऱ्या दरम्यान घरदारासह मठ, मंदिरे भ्रष्ट-नष्ट केली. १७ स्वाऱ्या दरम्यान प्रचंड लुटही नेली पण अखेरीस १८व्या स्वारीत त्याने उत्तर प्रांतातील राजा जयपाल व त्याचा पुत्र अनंगपाल यांचा पराभव करुन पंजाब, सिंध व मुलतान प्रांतांचा गझनी साम्राज्यात समावेश करत खैबरखिंडीवर ताबा मिळवला.

पुढे गझनवी वंशानंतर १२व्या शतकात सत्ता घोरी वंशाकडे गेली. महमंद घोरीने सत्ताविस्ताराच्या उद्देशाने हिंदुस्थानावर वांरवार स्वाऱ्या केल्या. घोरी, खिलजी, तुघलक सत्तांनंतर भारतात / हिंदुस्थानात स्थिर सत्ता निर्माण केली ती फक्त मुघलांनीच.

मुघलांपूर्वी अस्थिर इस्लामीसत्तांना उत्तरप्रांतावर आपला पूर्ण अंमल बसविण्यात अपयश आले होते. मुघलांच्या दोनशे वर्षांच्या सत्ताकाळात उत्तर प्रांतावर मजबूत पक्कड होती. दक्षिण प्रांतांत १३२०-१३३० च्या दशकात विजयनगर व बहामनी सत्तांचा उदय झाला. पुढे १३४७ मध्ये विजयनगरचा पराभव करून बहामनींचे मांडलिक एवढेच यादवांचे अस्तित्व राहिले. दक्षिण प्रांतात यादवानंतर बहामनींचा एकछत्री अंमल होता. बहामनी साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, निजामशाही, बिदरशाही, आदिलशाही, कुतुबशाही व इमादशाही सत्तांचा उदय झाला. इस्लाम सत्ताधीशांनी आपल्या पदरी हिंदू सरदारांना सेवेत ठेवले. समस्त हिंदू सरदारांनी आपल्या स्वाभिमानाला मूठमाती देऊन चाकरी करण्यात धन्यता मानली.

उत्तर प्रांतातील इस्लाम सत्ताधीशांना महाराणा प्रतापसिंगाचा अपवाद वगळता कोणीच आव्हान दिले नाही. १५७६ च्या हळदीघाटाच्या लढाईत महाराणा प्रतापचा पराभव होऊनही मुघलांशी अविरत झुंज देत राहिला.

उत्तर व दक्षिण प्रांतातील मुस्लीम सुलतानशाह्यांच्या परस्परांच्या वैरामुळे व एकमेकांवरील आक्रमणाच्या भीतीने दक्षिणेत स्थानिक मराठा समाजातील अग्रेसर कुटुंबाचे महत्त्व वाढले. सतराव्या शतकाच्या प्रांरभीच्या काळात दक्षिणेत निजामशाहीचा अस्त आणि भोसले घराण्याचा समांतर उदय ह्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या.

शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांस निजामशाही वजीर मलिक अंबर याने पुणे-सुपे परगणे, शिवनेरी, चाकण किल्ल्यांच्या जहागिरीसह पंचहजारी सरदारी दिली. पुढे शहाजी राजांनी बलाढय-मोगले सेने विरुध्द पराक्रम करीत सर्वत्र एक झुंजार लढवय्या म्हणून किर्ती पसरली.

उत्तरेत बादशाह अकबरच्या मृत्यूनंतर जहांगीर गादीवर आला. पुढे १६२७ मध्ये दिल्लीच्या तख्तावर आरुढ झाल्यानंतर शहाजहानने दक्षिणेकडे आपला मोर्चा वळविला. निजामशाही बरखास्त करण्याच्या उद्देशापेक्षाही शाही धर्माने हिंदू असलेल्या मराठयांचे वाढणारे सामर्थ्य ही बाब होती.

निजामशाही वाचविण्याकरिता होणारी धावपळ व त्रास या बाबींचा विचार करुन शाहाजीराजांनी जिजाऊ माँसाहेबांना किल्ले शिवनेरीवर ठेवले. गरोदरपणात त्यांना आराम मिळावा म्हणून राजांनी ही व्यवस्था केली. भीमाशंकराच्या कुशीत अन् नाणेघाटात वसलेल्या किल्ले शिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० रोजी महाराष्ट्राच्या इतिहासातील गौरवशाली घटना घडली … शिवरायांचा जन्म झाला.

अखेर निजामशाहीच्या अस्तांतर शहाजीराजांनी आदिलशाहीत चाकरी पत्कारली. पुढे मुख्य ठाणे बंगलूरला हलविले, पण जहागिरीतील प्रदेश आपल्या ताब्यातच ठेवला. काही वर्षे बंगलूरला सहकुटुंब राहिल्यानंतर शहाजीराजांनी बाल शिवाजी व जिजाऊ माँसाहेबांना दादोजी कोंडदेवासमवेत पुणे येथे ठेवले. पारतंत्र्याच्या अंध:कारात चाचपडत असलेल्या महाराष्ट्र भूमीला मुक्त करण्याकरीता उचलेले पहिले पाऊल होते.

जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांना रामायण महाभारताच्या गाथा कथन करुन चांगले संस्कार दिले. स्वधर्म, स्वराज्य अन् परधर्मीयांचा आदर हे गुण अंगी उतरविले. माँसाहेबांच्या संस्कारामुळे व प्रेरणेने प्रेरीत होऊन बालवयातच शिवरायांनी रायरेश्वरी शिवपिंडीवर रक्ताचा अभिषेक करीत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

सह्याद्रीतील गड किल्ल्यांचे महत्त्व राजे जाणून होते. बालवयातच तलवारबाजी, भालाफेक, घोडदौड असे युध्दशास्त्रातील बहुतांश प्रकारात राजांनी प्राविण्य प्राप्त केले होते.वडीलांच्या स्वप्नपूर्ती दृष्टीने राजे आपल्या मावळयासह संघटन करीत होते. पिढीजात जहागिरी भोवतालच्या प्रदेशातील लोकांना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून देत होते. वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी १६४६ साली तोरणा काबीज स्वातंत्र्ययात्रेस आरंभ केला. पुढे पुरंदर, वज्रगड, राजगड उर्फ मुरुंबदेव, सिंहगड ताब्यात घेतले. हिंदवी स्वराज्य प्रथम राजधानी किल्ले राजगड १६४७ साली घोषित केली

गनिमीकावा-युध्दनितीचे शास्त्र मलिकअंबर शहाजीराजे नंतर शिवरायांनी सुधरविले, समस्त इस्लामी सत्तांनी गनिमी कावा युध्दनीतीचा धसका घेतला. शिवपूर्व काळात दुय्यम प्रतीची शस्त्रास्त्रे हिणकस युध्दनीती आणि दुर्बळ मनौधैर्य यांमुळे हिंदुच्या पराभवाची किमान सहस्त्र वर्षाची परंपरा होती. विस्कळीत मराठी समाजाचे स्वराज्याच्या ध्येयाने भारावलेल्या एका एकजीव राष्ट्रात रुपांतर साधण्यास शिवरायांना यश आले. शिवकाळात मराठी मनोधैर्याने अभूतपूर्व उंची गाठली.

हिंदवी स्वराज्याचा वाढता विस्तार आदिलशाही दरबारी कळीच्या मुद्दा बनला. तेव्हा १६५९ मध्ये शिवरायांना संपविण्याचा विडा उचलून स्वारीवर आला. हिंदू देवता, मंदिरांची विटबंना करीत प्रजेचे हाल करीत सोलापूरमार्गे वाई जवळ अफझलखान आला. राजगडाहून महाराजांनी प्रतापगडी मोर्चा हलविला. अफझल व अफाट आदिलशाही फौजेचा सामना करण्यासंबंधी विचारविमर्श करुन जावळीच्या जंगलात प्रतापगडांपासून जवळ भेट घेण्याचे निश्चित केले. पुढे ११ नोव्हेंबर १६५९ रोजी शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला अन् संभाजी कावजीने त्यास यमसदनी पाठविले. अफाट आदिलशाही फौजेचा दारुण पराभव केला. शिवरायांच्या या भीमपराक्रमामुळे इस्लामी सत्ताधीशांना वचक बसली. दख्खन जिंकण्याच्या उद्देशाने १६६३ मध्ये औरंगजेबाने मामा शाहिस्तेखानास फौजफाटा देऊन पाठविले. शाहिस्तेखानाने पुणे परिसरात धुमाकूळ घातला. अन् लाल महालात तळ ठोकला. तेव्हा ५ एप्रिल १६६३ च्या अमावस्येच्या रात्री अचानक छापा टाकून शाहिस्तेखानाची बोटे छाटली. पाठलाग करणाऱ्या मोगल सेनेला हुलकावणी देत त्यांची फटफजिती केली. पुढे १६६५ च्या मानहानीकारक पुरंदर तहात मोगलांना २५ किल्ले देऊन तह घडवून आणला. औरंगजेबाने भेटीस आलेल्या शिवरायांना मे १६६६ मध्ये शिवरायांना नजरकैद केले. १७ ऑगस्ट १६६६ रोजी महाराजांनी आग्राहून सुटका करुन घेतली. मोगल दरबारातील मंडळींनी पुन्हा शिवरायांच्या नावाचा धसका घेतला.

गनिमी कावा युध्दनितीत तरबेज मराठयांनी १६७२ फेब्रुवारीत प्रथमच मुघल सैन्याशी समोरासमोर पराकाष्ठेच्या लढा दिला. लाखोंच्या फौजा आमने सामने असतानाही मराठयांनी विजय मिळवला. बलाढय हिंदवी स्वराज्याचे मराठे आता आक्रमकाच्या भूमिकेत इस्लामी सत्तासमोर उभे ठाकले.

हिंदवी स्वराज्याच्या वाढत्या पसाऱ्याचा विचार करुन राजांनी १६७२ मध्ये राजधानी रायगडाला हलविली. रायगडाच्या पठारावर शहरच वसविले. अखेर ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी ६ जून १६७४ रोजी शिवाजीराजे सिंहसनाधीश्वर झाले. हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम राजे झाले, छत्रपति झाले.

 

लेखक ;- श्री. संजय ढमाळ

Leave a Comment