दिल्ली मॉडेल आता महाराष्ट्रातही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ मुंबई : राजधानी दिल्लीमध्ये दणदणीत विजय संपादन केल्यानंतर आम आदमी पक्षाने पक्ष विस्तारासाठी आता महाराष्ट्राच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. आपने आर्दश विकासाचे ‘दिल्ली मॉडेल’ निवडणुकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सोमवारपासून ‘आप’ने राष्ट्रव्यापी संपर्क मोहिमेला प्रारंभ केला आहे.

आम आदमी पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीकरांची मने जिंकल्यानंतर आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला आहे. त्यासाठी सोमवारपासून राज्यभर संपर्क मोहीम सुरू करण्यात आली असून, २३ मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. विकासाचे केजरीवाल मॉडेल महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे दिल्लीप्रमाणे देशभरातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम उत्तम शासन आणि राजकारणाद्वारे करता येईल. या मोहिमेंतर्गत दिल्लीतील विकासाचे मॉडेल आणि महाराष्ट्र मॉडेलमध्ये तुलना केली जाईल.

आपच्या ‘आर्दश दिल्ली मॉडेल’मुळे दिल्लीकरांच्या जीवनात कसा कायापालट झाला आहे. याची माहिती महाराष्ट्रातीलही जनतेला मिळेल, असा दावा पक्षाने केला आहे. सत्तेचे राजकारण करण्यापेक्षा सामान्य जनतेच्या शाळा, रुग्णालय, वीज आणि महिला सुरक्षेसह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आम आदमी पक्ष एकतर्फी विजय संपादन करण्यात यशस्वी झाला. दिल्लीमधील केजरीवाल मॉडेलचे अनुकरण अनेक राज्यांनीदेखील केले असून, काही राज्य सरकार मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तसेच शिक्षण क्षेत्रातदेखील मूलभूत बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, आपकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना प्रथम लक्ष्य केले जाणार आहे. त्यानंतर पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी वातावरण निर्मिती करून भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेलाही पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीकरांची मने जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे विकासाचे आदर्श दिल्ली मॉडेल आता महाराष्ट्रातही घरोघरी पोहोचवणार आहे. त्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार असून, महाराष्ट्रात आप नवा पयार्य देणार आहे. आगामी नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकीत आप स्वबळावर ताकदीने लढत देईल. सध्याचे जाती-धर्माच्या नावावर चाललेले राजकारण जनतेला नको आहे.

आप जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे राजकारण करत आहे, यापुढेही करत राहील. जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवणे म्हणजे राष्ट्रनिर्माण, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. २४ तास पाणी, वीज, शेती, चांगले शिक्षण, आरोग्य हे जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवणे हेच राष्ट्रनिर्माण, ते आम्ही करत आहोत. दिल्लीकरांची मने जिंकली, आता महाराष्ट्रात हेच दिल्ली विकासाचे मॉडेल घरोघरी पोहोचवून यशस्वी करू.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment