Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtraSpacial

जिल्ह्यातील आठ नागरिकांची नमुना चाचणी निगेटीव, कोरोना बाधित एका रुग्णाची प्रकृती उत्तम

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविलेले्या १५ व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुन्यांपैकी ८ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून ते कोरोना बाधित नसल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

दरम्यान यापूर्वी आढळलेला कोरोना बाधित रुग्णाची प्रकृती उत्तम असल्याचे आणि त्याला कोणताही त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा रुग्णालयाने आज आणखी दोघा जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविले आहेत.

दरम्यान, यापूर्वी बाधित सात देशांशिवाय दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिका येथून आलेल्या नागरिकांचीही तपासणी केली जाणार असून त्यांना जिल्हा रुग्णालय येथे देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे तर इतर देशातून आलेल्या नागरिकांना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने हा धोका आपण लवकर संपवू शकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत गर्दीत जाणे टाळावेस असे आवाहन त्यांनी केले. कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात पुण्याहून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

महानगरपालिका आयुक्त एस.एन. म्याकलवार, निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपा आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यावेळी उपस्थित होते.

श्री द्विवेदी म्हणाले, की, जे सध्या आठ जणांचे नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. ते निगेटीव आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. मात्र, चीन, इटली, इराण, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, दक्षिण कोरियाबरोबरच आता दुबई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेतून आलेल्या नागरिकांना वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, ज्या नागरिकांना घरीच वेगळे देररेखीखाली ठेवले जाणार आहे, त्यांनी घराबाहेर पडू नये, यासाठी त्यांच्यावर आरोग्य विभाग आणि पोलीस अंमलदारामार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, जेणेकरुन त्यांनी स्वताच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, तसेच इतर नागरिकांच्या संपर्कात येऊन प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी.

तसे न केल्यास संबंधित नागरिकांना जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखाली ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. घरीच देखरेखीखाली ठेवलेल्या नागरिकांच्या हातावर तशा प्रकारे नोंद केली जाईल, जेणेकरुन त्यांना आपण इतरांच्या संपर्कात यायचे नाही, याबाबत जागरुकता येईल, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद, महानगरपालिका अथवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महासभा स्थगित कराव्यात आणि एकाचवेळी गर्दी किंवा अनेक नागरिकांचा संपर्क येणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचेही श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

यात्रा, जत्रा, मोठे उत्सव याठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आवाहन यापूर्वीच करण्यात आले असून संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यामार्फत तशा सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मंगल कार्यालयांनाही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.

आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. एकमेकांसोबतचा संपर्क टाळावा, असे ते म्हणाले. यापूर्वीच महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र तसेच लगतच्या क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, आयटीआय, तंत्र प्रशाला, निवासी वसतीगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय, कोणतेही खासगी क्लासेसही या काळात सुरु राहणार नाहीत. तसे करणार्‍यावर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी टोल फ्री १०४ क्रमांक करोना विषयक शंका समाधानासाठी उपलब्‍ध करण्‍यात आला आहे.

याशिवाय जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय, अहमदनगर येथे करोना नियंत्रण कक्ष स्थापन ( 0241-2431018 ) करण्यात आला असून तो २४ तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा 1077 या टोल फ्री क्रमांकावरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.ahmednagarlive24.com

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button