BreakingMaharashtraPoliticsSpacial

महत्वाची बातमी : लॉकडाऊनच्या काळात शेतीशी संबंधित व्यवसायांना सूट

मुंबई :- राज्य शासनाने 3 मेपर्यंत घोषित केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शेतीशी संबधित विविध बाबींना सूट दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या माल आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून बसून खाण्याची व्यवस्था नसलेली मिठाईची दुकाने, नाष्ट्याचे पदार्थ आणि फरसाणाची दुकाने यांनाही सूट देण्यात आली आहे.

कोविड-19 (कोरोना विषाणू) चा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य शासनाने सुरुवातीला 30 एप्रिलपर्यंत आणि नंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे.  या कालावधीत ज्या बाबींना सवलत देण्यात आली आहे, त्या याविषयी यापूर्वी 25 मार्च रोजी आणि 15 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये आता नव्याने काही बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

 • मंत्रालय आणि संलग्न कार्यालये कमीत कमी मनुष्यबळात चालविण्यात येतील याची संबंधित विभागांच्या सचिवांनी काळजी घ्यावी. मंत्रालय परिसरात आणि बोलताना चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक आहे.
 • शेतीशी आणि वनांशी संबंधित खालील बाबींना परवानगी देण्यात येत आहे

–      शेती उत्पादनांची खरेदी करणाऱ्या (किमान हमी दरासह) संस्था, विशेषतः कापूस आणि तूर डाळ यांची खरेदी करणाऱ्या संस्था

–      कृषी उत्पन्न बाजार समिती संचालित किंवा राज्य शासनाने अधिसूचित केलेली मंडी. तथापि जागेवरच्या खरेदीस प्रोत्साहन दिले जावे

–      शेतकऱ्यांकडून आणि शेतमजुरांकडून करण्यात येणारी शेतीची कामे

–      मासेमारी, मत्स्य उद्योगासाठी लागणारे खाद्य आणि व्यवस्था, शित साखळी, विक्री व पणन, मत्स्यपालन, व्यावसायिक मत्स्यकेंद्र, खाद्य केंद्र, मासे, कोळंबी वाहतूक आणि अन्न उत्पादने, मत्स्य बीज आणि खाद्य, यासाठी काम करणारे कामगार

–      पेसा म्हणजेच पंचायत (अनुसुचित क्षेत्रावर विस्तारीत) कायदा, 1996,  नॉन पेसा वन हक्क कायदा क्षेत्रातील किरकोळ वन उत्पादने( साठा, प्रक्रिया, वाहतूक आणि विक्री), वने व बिगर वने क्षेत्रातील तेंदू पत्ता वेचणी, साठा आणि गोदामापर्यंतची वाहतूक

–      जंगलात वणवे टाळण्यासाठी पडलेली लाकडे वेचणे, तात्पुरत्या विक्रीसाठीचे डेपो

 • राज्याच्या सर्व सीमा प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात याव्यात.  आवश्यक तसेच गरज असलेल्या साहित्य व वस्तूंच्या वाहतुकीसाठी या सीमा खुल्या राहतील.
 • जीवनावश्यक तसेच इतर वस्तूंसाठी आंतरराज्यीय तसेच दोन राज्यांमधील ट्रक वाहतूक, मालवाहतूक सुरु राहील.  मात्र वाहनचालकाव्यतिरिक्त फक्त एका व्यक्तीला विहित कागदपत्रानुसार परवानगी असेल. यासाठी वेगळ्या परवानगीची गरज नसेल. रिकामे ट्रक तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना माल आणण्यासाठी किंवा पोहोचविण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
 • शीतगृहे, वखार सेवा, ठोक विक्री  आणि वितरण व्यवस्था
 • पुरवठा साखळी आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणि मालाची वाहतूक
 • अन्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक साधनांसह सर्व प्रकारचा माल आणि वस्तू यांचे ई-कॉमर्सद्वारे वितरण.
 • सेबीद्वारे अधिसूचित केलेल्या एनबीएफसी आणि भांडवली बाजारातील सेवा
 • बसून खाण्याची सुविधा नसलेली मिठाईची दुकाने, नाष्ट्याचे पदार्थ, फरसाण
 • शेती अवजारांशी संबंधित कस्टम हायरिंग सेंटर,
 • शेतीसाठी लागणारे बी बियाणे, खते, कीटकनाशके, अवजारे, अवजारांचे सुटे भाग (त्यांच्या पुरवठा साखळीसह), दुरुस्ती ही दुकाने खुली राहतील.
 • ट्रक दुरुस्तीची विशेषत: पेट्रोल पंपाजवळची दुकाने सुरु राहतील.
 •  वीज वितरण आणि पारेषण करणाऱ्या जनित्र (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्तीची दुकाने
 •  शेती आणि फुलशेती उत्पादनांशी संबंधित प्रक्रिया, पॅकेजिंग आणि वाहतूक
 •  बी-बियाणे, खते, आणि कीटकनाशके यांचे उत्पादन आणि पॅकेजिंग
 • कोळसा आणि खाण उत्पादने, वाहतूक, खाण उद्योगांना स्फोटकांचा पुरवठा तसेच खाण उद्योगाशी इतर बाबी
 • अन्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे तयार करणारे उद्योग
 • गव्हाचे पीठ, डाळी, खाद्यतेल उत्पादन करणारे सूक्ष्म मध्यम आणि लघु औद्योगिक घटक
 • बंदरे, विमानतळ,राज्याच्या सीमा येथील सीमाशुल्क तपासणी तसेच जीएसटीएन हब, एमसीए 21 यांना सूट देण्यात आली आहे.

वरील सर्व परवानगी लॉकडाऊनमधील नियमांचे पालन करण्याच्या अटीवर देण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेच्या प्रमुखाची अथवा दुकानाच्या मालकाची राहील.  जिल्हा यंत्रणांनी याचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करण्याचे आदेश या अधिसूचनेद्वारे देण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close