पगार मागणार्‍या आठ साखर कामगारांना व्यवस्थापनाच्या तक्रारीवरुन अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर ;- विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील आठ कामगारांनी पगाराच्या मागणी करता आंदोलन केले, म्हणून त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करीत महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने आंदोलकांची निर्दोष सुटका करण्याची

मागणी मुख्यमंत्री, सहकार मंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती सरचिटणीस सुभाष काकुस्ते, अध्यक्ष पी.के. मुंडे, कोषाध्यक्ष व्हि.एम. पतंगराव, सहचिटणीस आनंदराव वायकर यांनी दिली आहे. पंढरपूर (जि.सोलापूर) येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे अनेक महिन्यापासून पगार थकले आहेत.

कारखान्याच्या व शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून कामगार पगार केव्हातरी मिळेल अशा अपेक्षेने काम करत राहिले. पण घरचीही शिल्लक, शिदोरी संपल्यावर थोडेफार पगार करा. अशी कामगारांनी मागणी केली होती. त्यासाठी निवेदन देणे, गेटवर जमून घोषणा देणे याप्रमाणे सनदशीर मार्गाचा अवलंब करीत होते.

कारखाना व्यवस्थापनाने म्हणजे, चेअरमन भरत भालके, व्हा. चेअरमन लक्ष्मण पवार यांनी पगार तर केले नाहीत. उलट कामगारातून पुढारपण करणार्‍यांना, आठ कामगारांना त्यांच्याविरोधात खोटे आरोप करून पोलिसात तक्रार केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी शहानिशा न करता आंदोलकांवर आरोपपत्र ठेवून न्यायालयापुढे हजर केले. त्यात त्यांना एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.

पेमेंट ऑफ वेजिस अँक्ट प्रमाणे, तसेच औद्योगिक संबंध अधिनियमाप्रमाणे, कामगारांचे मागील महिन्याचे पगार पुढच्या महिन्याच्या दहा तारखेच्या आत करणे बंधनकारक आहे.कोणतेही कारण न देता केलेल्या कामाचे पगार थकवता येत नाहीत. असे असताना व्यवस्थापनाने स्वतः गुन्हा केला आहे.

आणि पगार मागितले, म्हणून कामगारांवर खोटे आरोप करून तक्रार केली आहे. खरे तर, या प्रकरणी कामगार आयुक्तांनी दखल घेऊन वेळीच कारवाई व कारखान्याच्या व्यवस्थापनाला समज दिली पाहिजे होती. पण तसे घडलेले नाही. सनदशीर मार्गाने आंदोलन करणारे, भारतीय राज्यघटनेने योग्य मागण्यांसाठी चळवळीचे जे स्वातंत्र्य दिलेले आहे.त्याची ही उघड पायमल्ली आहे.

यासंबंधात कारखान्यातील कामगारांच्या स्त्रियांनी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे यापूर्वीच तक्रार केली आहे. त्यात सविता दत्तात्रय निर्मळ, कविता रामदास, कमल बिभीषण लकटे, सविता पोपट शेळके, तनुजा शाहीन इनामदार, सविता रामचंद्र अंबुरे, आशा ऋषिकेश वाघमोडे, धोंडूबाई ज्योतिबा कुंभार यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या प्रकरणी सखोल चौकशी करुन येथील चेअरमन व व्हाईस चेअरमन कार्यकारी संचालक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अटक केलेल्या कामगाराची योग्य ती न्यायालयीन कार्यवाही करून, त्वरित सुटका करावी, येथील कामगारांच्या थकीत पगारापैकी ताबडतोब चार महिन्याचा पगार देणेबाबत संबंधितांना आदेश द्यावे, सरकारनेही या कामगारांना निर्वाहभत्ता देण्याचा निर्णय करावा,

महाराष्ट्रातील ज्या कारखान्यातील पगार थकले आहेत त्याचीही चौकशी सरकारने करावी, थकलेले पेमेंट ताबडतोब करण्याची कार्यवाही करणे संबंधात आदेश कारखान्यांच्या व्यवस्थापनाला द्यावेत, मा.साखर आयुक्तांनी याबाबत त्याच्यात कारखान्यांनी कामगारांचे थकीत पगार केल्याशिवाय विविध मागण्या विविध परवानग्या न देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Comment