Maharashtra

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात उतरली तरुणाई

नंदुरबार दि.23 : कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था प्रशासनाला सहकार्य करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीदेखील मदतकार्यात पुढाकार घेतला आहे.

विविध भूमिकांमध्ये हे विद्यार्थी प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. विशेषत: कपड्याचे घरगूती मास्क तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक डॉ.माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी स्वयंस्फुर्तीने जनजागृती कार्यात उतरले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

अनेक विद्यार्थ्यांनी हे ॲप डाऊनलोड करण्याबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांनादेखील या ॲपचे महत्त्व सांगितले. आशा स्वयंसेविकेच्या सोबत घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती असो वा सर्वेक्षण, विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क महत्त्वाचा असल्याने काही स्वयंसेवकांनी आपल्या अंगी असलेल्या शिवणकलेचा उपयोग करीत मास्क शिवले व त्याचे वाटप केले. विशेष म्हणजे यात विद्यार्थींनींसोबत विद्यार्थ्यांचादेखील सहभाग आहे.

आपापल्यापरिने स्थानिक स्तरावर कपडा उपलब्ध करून घेत हे विद्यार्थी मास्क शिवत आहेत. या उपक्रमात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे.

आरएफएनएस महाविद्यालय अक्कलकुवा, एसटी को ऑप. एज्युकेशन सोसायटी शहादा, जीटीपी कॉलेज नंदुरबार, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, कला महाविद्यालय बामखेडा अशा जिल्ह्यातील विविध भागात असेलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबविला आहे.

विद्यार्थ्यांनी कपड्याची व्यवस्था जमेल तशी केली. काहींनी दुकानातून आणला तर काही विद्यार्थ्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या शर्टपीसचा वापर केला. काहींनी घरातील जुने कापड उपयोगात आणले.

थोडेथोडे करून काम वाढत गेले आणि आता उत्साहाने विद्यार्थी यात सहभाग घेत आहेत.

पोलीस मित्र म्हणून सुरक्षेचे काम, सॅनिटायझरचे वाटप, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, साबण वाटप, हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखविणे अशा विविध कामात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आहे.

काही विद्यार्थ्यांनी अंगणवाडीत पोषण आहार वाटप करताना बालकांना हात स्वच्छ धुण्याचे धडे दिले.

या संकटाच्यावेळी कर्तव्यभावनेने राष्ट्रीय सेवा योजनेचे ही विद्यार्थी आपले ब्रीद खरे करीत गावातील फवारणी, गरजूंना अन्नधान्य वाटप अशा कार्यात स्वत:ला गुंतवून घेत आहेत.

सोशल मीडियाचा अनुकूल उपयोग करून घेत त्यांनी जनजागृतीवरही भर दिला आहे. त्यांची ऊर्जा आणि कार्य इतरांनाही कोरोनाशी लढण्याची प्रेरणा देत आहे.

लिना पाटील, अनरद ता.शहादा – कोरोनासारखे संकट असताना ‘नॉट मी बट यू’ या आमच्या ब्रीदवाक्यानुसार काहीतरी मदत केली पाहिजे या भावनेने मास्क शिवले. दररोज 100 याप्रमाणे 500 मास्क शिवून गावात वाटले. संकटाशी लढताना योगदान देता येते याचे समाधान आहे.

प्रतीक कदम, जीटीपी नंदुरबार – देशासाठी प्रत्येक व्यक्ती योगदान देत असल्याने आपणही काहीतरी करावे ही भावना होती. शेजारच्या मावशी मास्क शिवत असताना शिकून घेतले. 60 मास्क तयार करून महाविद्यालयामागील वस्तीत वाटले. आरोग्यसेतूबाबत व्हिडीओ तयार करून सोशल मीडियाचा जनजागृतीसाठी वापर केला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close