शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि.२३ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी दि. २८ मार्च २०२० पासून शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला आहे.

दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत ५ रुपये थाळी याप्रमाणे १ लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येत होते. लॉकडाऊनमुळे यामध्ये वाढ करुन शिवभोजन थाळीची संख्या दीड लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे.

शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने यापूर्वीच १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा लॉकडाऊनच्या काळात दि.२ मे पर्यंत वाढीव शिवभोजन थाळी योजनेचा लाभ  सुरु राहणार आहे.

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसेच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे.

तसेच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असून सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.  या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment