Maharashtra

सहा महिन्यांच्या कोरोना मुक्त बालकाला डिस्चार्ज

रत्नागिरी दि. 25: सहा महिन्यांचा चिमुकला आपल्या आईच्या कडेवर बसून लिफ्टमधून बाहेर येताच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक स्टाफ आणि इतरांनी टाळ्यांचा गजर करीत या बालकाच्या कोरोनामुक्तीचे स्वागत केले. 

15 दिवसांच्या उपचार व तपासणीनंतर साखरतर येथील या बालकाचा कोरोनावरील विजय हा संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा विजय ठरला आहे.

कोरोना अर्थात कोविड-१९ विषाणूचा पहिला रुग जिल्ह्यात आढळला आणि आरोग्य यंत्रणा, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली.

कोरोनाचा फैलाव रोखणे ही प्राथमिकता ठेवून त्याची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणे हे आगळे कोरोना युध्दच जणू सुरु झाले.

वेगवेगळया पातळ्यांवर वेगवेगळी कामे करीत कोरोना योद्धे यात उतरले. देशपातळीवर टाळेबंदी अर्थात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली यानंतर सर्वच ठिकाणांवर संचारबंदी आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजण्यासाठी प्रारंभ झाला.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण गुहागर तालुक्यात आढळला. त्याचा विदेश प्रवासाचा इतिहास होता. या रुग्णाच्या परिसरास 20 मार्च 2020 रोजी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. त्यावेळेपासून अहोरात्र कोरोना रोखण्यासाठी सर्वच जण कार्य करीत आहेत.

जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी करणे व त्यांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करणे. सोबतच आरोग्य यत्रंणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुविधा आदिंची युद्धपातळीवर सुरुवात झाली.

साखरतर हे शहरानजीकचे गाव. या गावात कोणताही प्रवास इतिहास नसताना एका महिलेस कोरोना झाल्याचे निदर्शनास आले. त्यापाठोपाठ त्याच घरातील अन्य एका महिलेसह या सहा महिन्यांच्या चिमुकल्यास देखील कोरोना बाधा झाली होती.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करण्यात आले. रुग्णालयाचे डॉ. प्रकाश जांभुळकर यांची कोरोना उपचारासाठी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी व इतर डॉक्टर आणि नर्स यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे कोरोना रुग्णांवर योग्य उपचार होऊन त बरे झाले आहेत असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.

पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सोबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधाचे विविध उपाय योजण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाने जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद ठेवल्या आहेत.

महसूल यंत्रणा तसेच ग्रामविकास विभागाची यंत्रणा आपल्या ग्राम कृती दलाच्या माध्यमातून जिल्ह्यात कोरोना मुक्तीसाठी मेहनत घेत आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनीही लॉकडाऊन काळात घरातच राहून शासन निर्णयांचे पालन करुन  यात आपला मोलाचा वाटा उचलला आहे. हेल्पिंग हँडच्या माध्यमातून  एकत्र आलेल्या सामाजिक सेवा देणाऱ्या संस्था, संघटना आदिंचाही यात वाटा आहे. या सर्वांच्या बळावर जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यात यश आले .

यापुढील काळात हीच स्थिती कायम राखणे आणि जिल्हा कोरोनामुक्त राखणे हे जिल्ह्यासमोर मोठे आव्हान आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण कटिबध्द आहे याचीच प्रचिती आज या बालकाच्या डिस्चार्जप्रसंगी आली.

आजवर सर्वांनी दिलेल्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. मात्र हे कायम राखण्यासाठी सर्वांनी असेच सहकार्य करावे या शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close