Breaking

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडीकल, नर्सिंग आणि हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण १० हजार ८१५ युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे.

सध्या सुरु असलेल्या कोव्हीड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन सोसायटीने या युवक-युवतींची यादी आरोग्य विभागास तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहे.

हेल्थ केअर सेक्टरमधील हे प्रशिक्ष‍ित उमेदवार असून आवश्यकतेनुसार त्यांच्या नियुक्तीबाबत विचार व्हावा, अशी शिफारस करण्यात आली आहे.

प्रशिक्ष‍ितांपैकी ९८५ उमेदवारांनी नियुक्तीसाठी होकारही दिला असून विविध जिल्हे आणि महापालिकांमार्फत या उमेदवारांना नियुक्त्या देण्याचे विचाराधीन आहे. काही ठिकाणी त्याप्रमाणे कार्यवाहीही करण्यात येत आहे.

राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत विविध प्रकारची कौशल्य विकासाची प्रशिक्षणे देण्यात येतात.

यामध्ये लघु कालावधीची प्रशिक्षणेही असतात. सोसायटीमार्फत आरोग्य सेवा क्षेत्रातील बेडसाईड असिस्टंट, नर्सिंग एड, जनरल ड्युटी असिस्टंट, जनरल ड्युटी अटेंडंट, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, डायलेसीस असिस्टंट, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन तसेच फार्मसी असिस्टंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत १० हजार ८१५ युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे.

सध्या देशभरात होत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, आरोग्य सेवा पुरविणाऱ्या यंत्रणेवरिल ताण आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा लक्षात घेता या उमेदवारांचा उपयोग होऊ शकेल.

त्यादृष्टीने या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत विचार व्हावा, अशी शिफारस सोसायटीमार्फत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांची यादी पाठवून करण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये या उमेदवारांची मदत घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.

प्रशासन आणि उमेदवारांमध्ये समन्वय घडवून आणून त्यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास सोसायटी पाठपुरावा करीत आहे.

कौशल्य विकास सोसायटीमार्फत आरोग्य विषयक विविध सेवांसाठी प्रमाणित करण्यात आलेल्या उमेदवारांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.

अहमदनगर ८६, अकोला ६६, अमरावती ७४८, औरंगाबाद ३२२, बीड २५२, भंडारा ३६६, बुलडाणा ४२, चंद्रपूर ३२९, गडचिरोली ३५४, गोंदिया ५५, हिंगोली ५८, जळगाव ५८४, जालना ३८१, कोल्हापूर १५२, लातूर ७६४, मुंबई उपनगर २०४, मुंबई शहर २२०, नागपूर १५९७, नांदेड ३५५, नाशिक ६०१, उस्मानाबाद ८९, परभणी ३१३, पुणे ७०३, रत्नागिरी २७, सांगली ५०, सातारा ४०, सिंधुदूर्ग ८५, सोलापूर १४७, ठाणे १५३३, वर्धा १५, वाशिम १३१ आणि यवतमाळ १४६ अशा एकूण १० हजार ८१५ युवक-युवतींना आरोग्य सेवाविषयक कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close