Maharashtra

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज राहा – पालकमंत्री अनिल देशमुख

गोंदिया, दि. २५(जिमाका) : राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. कोणीही समाजात कोरोनाबाबत अफवा पसरवित असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून चांगले काम करावे, असे निर्देश पालकमंत्री अनिल देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेताना

आयोजित सभेत श्री. देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, खासदार प्रफुल पटेल, आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे व सहसराम कोरटे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे,

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ.विनायक रुखमोडे,

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमत मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, शहरातील भाजी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी भाजीबाजार मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवावेत. भाजीबाजारात नागरिकांनी सामाजिक अंतर राखावे, यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामाची मोठ्या प्रमाणात मागणी असून मजुरांमध्ये सामाजिक अंतर ठेवून ही कामे सुरू करावीत. एपीएल आणि बीपीएलच्या लाभार्थ्यांना पूर्ण धान्य वाटप करावे.

ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा गरजू व्यक्तींना देखील धान्य वाटप करावे. धान्य वाटप करतांना आधार लिंकचा प्रश्न उद्भवणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.

आजपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला असल्याचे सांगून श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील मौलवींची प्रशासनाने बैठक घेऊन मुस्लिम समाजबांधवांना आपल्या घरातच राहून, सामाजिक अंतर ठेवून धार्मिक कार्यक्रम छोट्या स्वरूपात करावे.

त्यामुळे विषाणूचा संसर्ग टाळता येईल, असे आवाहन मौलवींच्या माध्यमातून समाजबांधवांना करावे. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना चाचणी प्रयोगशाळा त्वरित सुरू करावी.

त्यामुळे स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूरला पाठवावे लागणार नाही. वेळेची बचत होऊन रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील. ‘सारी’  रोगाच्या प्रादुर्भावाची देखील आरोग्य यंत्रणेने दक्षता घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी.

लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग बांधवांना आवश्यक ती मदत करून त्यांच्या समस्यांची सोडवणूक करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

खासदार पटेल म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चांगल्या प्रकारे उपाययोजना करण्यात येत आहेत. कंटेंनमेंट झोनमध्ये येत असलेल्या गोंदियाच्या गणेश नगर येथील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.

गोरेगाव नगरपरिषदेतील साफसफाईची कामे त्वरित करावी. गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना मागील चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे प्रशासनाने त्याकडे लक्ष द्यावे.

गोंदियासाठी जास्तीत जास्त पीपीई कीटची मागणी आरोग्य यंत्रणेने वरिष्ठांकडे करावी, असेही त्यांनी यावेळी सुचविले.

जिल्ह्यात रोहयोच्या कामांची जिल्ह्यातील मजुरांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असून ही कामे सामाजिक अंतर ठेवून सुरू करावीत, अशी मागणी आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे व सहसराम कोरोटे यांनी एकत्रितपणे केली.

आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदियातील गणेश नगरच्या नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी त्वरित प्रशासनाने निर्णय घ्यावा. जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनास परवानगी देण्यात यावी.

त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना यामधून रोजगार उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगीतले. जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव त्वरित करावेत, अशी मागणीही यावेळी आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे यांनी केली.

आमदार कोरोटे यांनी रोहयोमधून भातखाचरांची कामे करण्यात यावी, अशी सूचना केली.

जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे म्हणाल्या, कन्टेनमेंट झोनमध्ये येत असलेल्या गोंदियातील गणेश नगरच्या नागरिकांची गैरसोय लवकरच दूर करण्यात येईल. अत्यावश्यक सेवेमध्ये असलेल्या गणेश नगरच्या नागरिकांना     ये-जा करण्यास सूट देण्यात येईल.

जिल्ह्यात १० कोविड केअर सेंटर आणि ०२ कोविड हॉस्पिटल आहेत. जिल्हा रुग्णालयात ५ व्हेंटिलेटर असून १२ व्हेंटिलेटरची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील सतरा शासकीय निवारागृहात ७७८ स्थलांतरित कामगार आश्रयाला आहेत.

इतर राज्यातील २२० कामगारांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना २6९ कोटी रुपये बोनस मिळणार असून त्यापैकी ११३ कोटी रुपये प्राप्त झाले आहे.

२४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७४ कोटी रुपये बोनस म्हणून वाटप केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

डॉ.राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात ग्रामपंचायत अंतर्गत रोहयोची विविध प्रकारची कामे सुरु असून या कामांवर एक हजार मजूर सामाजिक अंतर ठेवून काम करीत आहे. मजुरांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक शिंदे म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात चोख पोलिस बंदोबस्त असून ५४ अधिकारी आणि १८०० पोलीस विविध ठिकाणी तैनात आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांच्या आणि अन्य जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

२०६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५८०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांना हेल्पलाइन व टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close