Maharashtra

आनंददायी बातमी : आणखी एकजण कोरोनामुक्त

कोल्हापूर, दि. २६: जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर आज शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील कोरोनामुक्त तरूणाला येथील सीपीआरमधून डिस्चार्ज देण्यात आला.

या तरूणाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोना मुक्त झाला. टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात त्याला घरी सोडण्यात आले. ही जिल्ह्यासाठी आणखी एक आनंददायी बातमी ठरली आहे.

दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमाहून परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील उचत येथील तरूणाला 9 एप्रिल रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते.

14 दिवसानंतर या तरूणाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाला होता. आज कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

रूग्णालयातील अधिकारी – कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या तरूणाला निरोप दिला.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यावेळी या तरूणाच्या हातावर होम क्वारंटिनचा शिक्का मारला. आमदार चंद्रकांत जाधव यांनी या तरूणाला औषधे दिली. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी डिस्चार्ज कार्ड वितरीत केले.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

बावड्यातील महिलाही कोरोनामुक्त- डॉ. गजभिये

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यावेळी म्हणाल्या, जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोनामुक्त रूग्णांना 18 एप्रिल रोजी अथायू रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहेत. आज शाहूवाडीमधील उचत येथील आणखी एका तरूणाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. बावडा येथील महिलाही कोरोनामुक्त झाली आहे. 14 दिवसानंतरचे तिचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. परंतु, तिला न्युमोनिया झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. लवकरच तिलाही डिस्चार्ज दिला जाईल. उचत येथील आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या तरूणाच्या आईवरही उपचार सुरू आहेत. तिचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र तिचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. आठवड्यानंतर पुन्हा तिचा स्वॅब घेण्यात येईल. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिलाही डिस्चार्ज देण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close