Maharashtra

मालेगावातील एकाच वेळी तीन रुग्णांची कोरोनामुक्ती

 मालेगाव येथील मन्सुरा रुग्णालयातील तीन कोरोना बाधित रुग्ण हे उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा देवून आज घरी सोडण्यात आले,

मालेगाव शहरातून प्रथमच एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने नागरिकांचा आरोग्य प्रशासनावरील विश्वास वाढुन नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

मन्सुरा हॉस्पिटल मधून कोरोनामुक्त झालेल्या तीनही रुग्णांना घरी सोडण्यात आले त्यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया,

अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, इन्सिडन्ट कमांडट तथा उपायुक्त (प्रशासन) नितीन कापडणीस, उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, डॉ.सुशिलकुमार शिंदे, डॉ.अरुण पवार, महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरी, माजी आमदार रशीद शेख यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री.भुसे म्हणाले, तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असून रुग्णालयातील डॉक्टरांची टीम, परिचारिका, वॉर्डबॉय आदींसह इतर आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत.

रुग्णालयातील सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत असून, इतर सर्व कोरोना रुग्णही या रुग्णांप्रमाणे लवकरच बरे होतील, असा विश्वास व्यक्त करत मंत्री श्री.भुसे म्हणाले, मालेगाव मधील रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी वेळेवर रुग्ण दवाखान्यात आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आपल्या आरोग्य प्रशासनात आहे.

त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्याशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.

मालेगाव येथील कोरोनामुक्त झालेले हे रुग्ण अनुक्रमे 7 व 9 एप्रिल 2020 रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने योग्य उपचार करुन त्यांना कोरोनामुक्त करण्यात मोठे यश संपादन केले आहे. त्या रुग्णांचा अनुक्रमे 21 व 23 रोजी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

त्यानंतर पुन्हा 24 तासानंतर घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीतही त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने आज ते कोरोनामुक्त घोषित करुन घरी सोडण्यात आले. यात प्रामुख्याने मालेगाव येथील मदिनाबाद परिसरातील 35 वर्षीय महिला व खुशामदपुरा परिसरातील 45 वर्षीय महिला तर चांदवड येथील 27 वर्षाच्या पुरुषाचा समावेश आहे.

शहरातील रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आज एकाच वेळी तीन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याच्या बातमीने काही अंशी दिलासा मिळाला आहे. या यशाने हुरळून न जाता मोठ्या संख्येने दाखल रुग्णांमुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे.

आणि आपण याच प्रमाणे कसोटीने संपुर्ण जबाबदारी पार पाडल्यास शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यात नक्की यश मिळेल असे घटना व्यवस्थापक डॉ.आशिया यांनी सांगितले. तर नागरिकांनी देखील प्रतिबंधात्मक आदेशाचे व प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कोरोनामुक्त रुग्णांची बोलकी प्रतिक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेले सर्व निर्णय योग्य घेतले आहेत. त्यांच्या सुचनेनुसार सर्वांनी आप-आपल्या घरात थांबणेच योग्य असल्याची प्रतिक्रीया देतांना चांदवड येथील रहिवाशी आणि मन्सुरा हॉस्पिटल, मालेगाव येथुन कोरोनामुक्त झालेल्या 27 वर्षीय युवकाने म्हटले की, आई वडीलांचा आशिर्वाद व मनातील पॉझिटीव्ह विचारामुळे मला यातून बरे होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

हा आजार घाबरण्यासारखा नाही, यातून बरे होण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती आणि मनाची सकारात्मकता गरजेची आहे. मालेगावच्या नागरिकांना संदेश देतांना, ज्या रुग्णांना थोडे जरी आजाराची लक्षणे दिसत असली तरी तात्काळ रुग्णालयात जावे. प्रशासन सगळे व्यवस्थित हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर कोरोनामुक्त झालेल्या महिलांनी प्रतिक्रिया देतांना सामान्य रुग्णालयातील डॉ.महाले यांच्या टीम कडून खुप चांगल्याप्रकारे उपचार व सुविधा मिळाली असून त्यांचे त्यांनी आभार मानले. त्यानंतर जीवन हॉस्पिटल व मन्सुरा हॉस्पिटल या ठिकाणी स्थलांतरीत केल्यानंतर तेथेही चांगला अनुभव व चांगल्या सुविधा मिळाल्याचा अनुभव त्यांनी यावेळी कथन केला.

माझा सात वर्षाचा मुलगा याठिकाणी आजही दाखल आहे, आणि त्याला सोडून जातांना मला खुप दु:ख होत असल्याची भावना व्यक्त करत असा प्रसंग कुणावरही येवू नये यासाठी सर्व नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे व प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button