Maharashtra

झोपडपट्टी भागात ३५० आरोग्य पथके करणार तपासणी – विभागीय आयुक्त

पुणे, दि. २७ : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने झोपडपट्टी व दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आरोग्य तपासणीसाठी  350 पथके तयार केली असून या माध्यमातून गतीने आरोग्य तपासणी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे शहरामध्ये गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ज्येष्ठ नागरिक व ज्यांना इतर विकार आहेत जसे की, डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा अश्या वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणाऱ्या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे.

त्यामुळे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुढाकारातून एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत, त्या भागात 350 पथके पाठविण्यात येत आहे. या पथकाकडे पल्सऑक्सीमीटर, थर्मोस्कॅनर देण्यात आले आहेत.

या माध्यमातून विविध विकार असलेल्या रुग्णांचा तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची ऑक्सीजन सर्क्यलेशन लेव्हल, त्यांचे विकार नियंत्रणात आहेत की नाही, आणि त्यांना संभाव्य कोविड रोग होत असेल तर त्यांना वेगळे करुन त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्याबाबतची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतली आहे.

पुणे महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या मोहिमेअंतर्गत आपल्या घरातील ज्येष्ठ तसेच इतर काही विकार असणाऱ्या व्यक्तीला तपासून वैद्यकीय सल्ल्यानुसार आपल्या घरात वेगळ्या रुममध्ये ठेवणे किंवा मनपाने सोय केलेल्या ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. कोरोना या रोगावर मात करण्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.

60 ते 70 टक्के लोकांना हा रोग जीवघेणा ठरत नाही, मात्र ज्येष्ठ नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत या मोहिमेअंतर्गत त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.

डॉक्टरांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करा

सामान्य रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने सुरू करण्याबाबत निर्देश देवूनही बहुतांशी डॉक्टरांनी अद्याप क्लिनीक सुरू केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. तेव्हा वैद्यकीय अधिका-यांनी त्वरित हॉस्पिटल सुरू करून नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button