सोशल डिस्टन्सिंगचे लोकल रेशनिंग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नाशिक दि. 27 (जिमाका, वृत्तसेवा) : घरातील टाकाऊ पाईप आणि भोंगा एकमेकाला जोडलेला… तराजूजवळ भोंग्याचे तोंड तर त्याला जोडलेल्या पाईपाचे दुसरे तोंड ग्राहकाच्या पिशवीजवळ…सगळ्यांना उभे राहण्यासाठी रिंगण…शांततेत होत असलेले धान्य वितरण…

सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे पालन करीत स्वस्त धान्य दुकानाबाहेरचे हे चित्र आहे इगतपुरी तालुक्यातील मानवेढे या अतिदुर्गम गावातील. महिला रेशन दुकानदार पौर्णिमा भागडे यांनी ही अनोखी शक्कल लढवून कोरोना विरोधातील लढा सुरू ठेवला आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असल्याच्या बातम्या कानावर पडतात. किराणा दुकानांवर गर्दी उसळत आहे. मात्र अशाही परिस्थितीत मानवेढे या पुनर्वसित अतिदुर्गम गावातील स्वस्त धान्य दुकानदार महिलेने स्वयंप्रेरणेने ‘सोशल डिस्टन्स’ राखण्यासाठी अभिनव उपक्रम राबविला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ असणारी धान्य वितरण करणारी यंत्रणा तयार करून सोशल डिस्टन्सिंगला या महिला दुकानदाराने एकप्रकारे बळ दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  धान्य दुकान म्हटले, की एक प्रतिमा आपोआप डोळ्यासमोर उभी राहते.

गर्दी, गोंधळ आणि गैरसोय. त्यातच आता कोरोनाचे सावट इतके दाट झाले की, नागरिकांच्या सततच्या संपर्कात सामाजिक अंतर राखले जात नाही.

परिणामी कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. पंतप्रधान गरीब धान्य योजनेतून प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत मिळत आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानात नागरिकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. याचा पूर्ण विचार करून पौर्णिमा गणपत भागडे यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे.

 अशी लढविली शक्कल….

टाळेबंदी सुरू असल्याने आमच्या गावाला जोडलेल्या आदिवासी पाड्यातील लाभार्थ्यांची धान्य दुकानात मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. म्हणून सोशल डिस्टन्स आणि इतर नियमांचे पालन करण्यासाठी माझ्या कुटुंबातील सर्वांनी कंबर कसली. माझे सासरे तात्या पाटील भागडे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे विविध प्रकारचे निरुपयोगी टाकाऊ साहित्य पडून होते.

त्या साहित्यातील जास्त जाडीचा एक पाईप सासऱ्यांनी काट्याजवळून सहा मीटर लांब उतरत्या क्रमाने जोडला. मोजलेले धान्य त्यामध्ये ओतण्यासाठी जुना भोंगा त्यांनी नरसाळे म्हणून जोडला.

मोजलेले धान्य त्या नरसाळ्यात ओतले की लाभार्थ्याने आपली पिशवी पाईपाच्या दुसऱ्या टोकाला धरली की धान्य आपोआप पिशवीत टाकले जाते. यामुळे सोशल डिस्टन्सच्या नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. लाभार्थी संख्या जास्त असल्याने नियमांचे पालन व्हावे म्हणून नागरिकांना उभे राहण्यासाठी विशिष्ट अंतरावर रिंगण करण्यात आले आहे.

या कामात माझे पती गणपत भागडे यांची मदत होत आहे. शिधावाटप रजिस्टरमध्ये नोंदी, शिधापत्रिका हाताळणी आदी कामे तात्काळ करून लाभार्थ्यांना धान्यवाटप करण्यात येते.

कुटुंबातील सदस्य नियमांचे स्वतः पालन करून रांगेतील नागरिकांना मास्कचा वापर, हात धुणे, सोशल डिस्टन्स आदींचे महत्त्व सांगत असतात. या भागातील नागरिकांनी या आगळ्यावेगळ्या प्रयोगाचे स्वागत करून कौतुक केले असल्याचे पोर्णिमा भागडे यांनी सांगितले.

 प्रेरणादायी प्रयोग : तहसीलदार अर्चना पागिरे

पौर्णिमा भागडे यांच्या अनोख्या प्रयोगामुळे शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे उत्स्फूर्तपणे पालन होत असून, एक स्तुत्य उपक्रम असल्याचे इगतपुरीच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले. गावातील या प्रयोगामुळे कोरोनाला चांगल्या पद्धतीने प्रतिबंध करता येऊ शकणार आहे.

या प्रयोगाची अंमलबजावणी सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये राबविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पंतप्रधान गरीब योजनेअंतर्गत प्रती व्यक्ती 5 किलो तांदूळ मोफत आणि तत्परतेने मिळाल्याने नागरिकांची उपासमार रोखण्यात पोर्णिमा भागडे यांना यश आल्याचे श्रीमती पागिरे  म्हणाल्या.

सुलभ पद्धतीने मोफत तांदूळ मिळाला

पौर्णिमाताईंनी राबविलेल्या धान्य वितरणाचा उपक्रमामुळे आम्हा लाभार्थ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीने प्रधानमंत्री गरीब योजनेचा मोफत तांदूळ मिळाला आहे. त्यांच्या उपक्रमामुळे आमच्या मानवेढे गावाला नक्कीच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी तयार केलेल्या उपकरणातून तांदूळ घेताना मनात कोणतीच भीती राहत नाही.

Leave a Comment