पुण्यात कोरोना प्रतिबंधासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. २७ :-  पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून

त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.

राज्याच्या मुख्य सचिव कार्यालयातर्फे आज यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. श्री.अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. श्री. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे.

श्री. सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त तर, श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्वेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे.

हे चारही अधिकारी मूळ जबाबदारी सांभाळून पुणे महापालिका क्षेत्रातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सेवा देणार आहेत. या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment