ट्रेसिंग, टेस्टिंग वाढवण्यावर भर द्या – केंद्रीय आरोग्य पथक प्रमुख डॉ. गडपाले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोलापूर दि.२७ – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्व्हेक्षण, तपासणी (ट्रेसिंग) आणि वैद्यकीय चाचणी (टेस्टींग) करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा आरोग्य सेवा विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. ए. के. गडपाले यांनी आज येथे दिल्या.

डॉ. गडपाले यांच्या नेतृत्वाखालील पथक आज सोलापूर शहरातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक सोलापूर जिल्ह्यात आले होते. या केंद्रीय पथकाने सकाळी पाच्छा पेठ, हिंगलाज माता बॉईस मॅटर्निटी होम, वैशंपायन मेडिकल कॉलेज येथे भेट दिली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

केंद्रीय पथकामध्ये लेडी हार्डिग्ज मेडिकल कॉलेज मधील प्रोफेसर डॉ. व्ही. एस. रंधवा. प्रो. डॉ. अंशू गुप्ता, राममनोहर लोहिया, मेडिकल कॉलेजमधील डॉ. सागर बोरकर यांचा समावेश आहे.

बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

श्री. गडपाले म्हणाले, ‘सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब असली तरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी.

तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. शहरात अठ्ठावीस  दिवस दररोज सर्व्हेक्षण करण्यात यावे. प्रतिबंधित  क्षेत्रामध्ये दररोज सॅनिटायझर फवारण्यात यावे. सार्वजनिक शौचालये सॅनिटायझेशन करा. त्याचबरोबर संचारबंदी प्रभावीरित्या अंमलात आणावी.’

कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सज्ज ठेवा. बाधित रुग्णांना  हॉस्पिटल मध्ये भरती करण्यासाठी सनियंत्रण कक्ष सुरु करावा. या कामात स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट सेक्टर, सहकारी संस्था यांचा सहभाग घ्या. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांनादेखील उपचार मिळावेत यासाठी आवश्यक ते नियोजन करावे,   अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

खासगी डॉक्टरांची सेवा उपलब्ध  करुन घ्या. खासगी डॉक्टर  सेवा देण्यास तयार नसल्यास त्यांच्याशी चर्चा करा. तरीही तयार न झाल्यास कारवाई करा, असे डॉक्टर गडपाले यांनी सांगितले.

आरोग्य कर्मचारी आणि सेवक यांच्या सुरक्षितेची काळजी घ्या, असे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत जाणीव जागृती करा. नागरिकांना अद्यापही कोरोना विषाणूबाबत योग्य माहिती नाही.

सोलापूर सारख्या बहुभाषक शहरात कोरोना विषाणूबाबत विविध भाषांतून जाणीव जागृती करा. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, आरोग्य अधिकारी  डॉ. संतोष नवले, डॉ. मोहन शेगर, डॉ. सागर गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, हेमंत निकम, पोलीस उपायुक्त बापू बांगर आदी उपस्थित होते.

Leave a Comment