Maharashtra

कोरोनावर मात करीत दोन रूग्ण परतले स्वगृही…!

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना या शब्दाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. त्यामध्ये आपला देश, राज्य व जिल्हाही अपवाद नाही. कोरोना विषाणूच्या थैमानाने जग मेटाकुटीस आले आहे.

मात्र बुलडाणा जिल्ह्यातून कोरोनाच्या या हल्लकल्लोळात काही सुखद वृत्तही येत आहे. आज 28 एप्रिल रोजी आणखी दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे झाल्याने मलकापूर व बुलडाणा येथील रूग्णांना आज कोविड रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात एकूण 24 कोरोनाबाधीत रूग्ण होते. त्यापैकी एक मृत आहे. यामध्ये बुलडाणा 9, चिखली 3, दे.राजा 2, सिं. राजा 1, मलकापूर 4, शेगांव 3 व चितोडा ता.खामगांव येथे 2 रूग्ण होते. अशाप्रकारे जिल्ह्यात 24 रूग्ण आहेत.

त्यापैकी आतापर्यंत 15 रूग्णांना बरे झाल्याने रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये आज दोन रूग्णांची भर पडली असून ही संख्या 17 झाली आहे. सध्या कोविड रूग्णालयात 6 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे.

प्रशासनाने कंटेन्टमेंट झोन, लॉकडाऊन पूर्णपणे बंदी, विहीत कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचे दुकान उघडण्यास परवानगी आदी उपाययोजनांमुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या मर्यादित राहिली आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज दोन रूग्णांचा दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.

त्यांना आनंदाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने निरोप दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णाचे स्वागत केले. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने सिंदखेड राजा येथील एका रुग्णाला डिस्जार्ज देण्यात आला आहे.  त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले व भविष्यासाठी चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या. कोरोना आजारावर मात केल्याने रूग्णांचा चेहरा आनंदित होता.

सर्व नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. अत्यावश्यक कामासाठीच घरा बाहेर पडल्यास सोशल डिस्टन्सचे पालन करावे. गर्दी करू नये. चेहऱ्यावर मास्क अथवा स्वच्छ रूमाल वापरावा. शासनाच्या वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करावे. डॉक्टर्स, पोलीस यंत्रणा यांच्याशी सहकार्य ठेवा, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button