अमरावती जिल्ह्यात स्थानिक लॅबच्या मान्यतेचा मार्ग मोकळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अमरावती, दि. 28 : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधील कोरोना चाचणी लॅबमधून तपासण्यात आलेले कोरोनाचे नमुने एम्सच्या नमुन्याशी जुळले आहेत. तसा अहवालही एम्सने दिल्लीच्या आयसीएमआरला पाठविला आहे. त्यामुळे आता लॅब सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून सातत्याने लॅब लवकर कार्यान्वित होण्याकरीता पाठपुरावा होत आहे. विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये तयार करण्यात आलेल्या लॅबमध्ये 2 मशीन उपलब्ध आहेत. सोबतच येथील तज्ज्ञांनी एम्समध्ये आपले प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे.

या तज्ज्ञांनी आयसीएमआरने दिलेल्या मानकानुसार थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणे व ते जुळणे हे लॅबची मान्यता प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अत्यंत आवश्यक होते. सोमवारी तज्ज्ञ डॉ.प्रशांत ठाकरे यांनी रात्री 3 वाजता नमुन्यांची तपासणी करुन अन्य औपचारिकता पूर्ण केली. त्यानंतर या नमुन्यांचा अहवाल एम्सला पाठविला.

हा अहवाल एम्सच्या अहवालासोबत जुळल्यामुळे आता एम्सकडून हा अहवाल आयसीएमआरला पाठविण्यात येईल. याच अहवालाच्या आधारावर आयसीएमआर लॅबला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या लॅबकरिता आमच्या टीमने खूप परिश्रम घेतले आहे. रात्री 3 वाजेपर्यंत टीम काम करत होती. एम्समध्ये नमुने जुळले असून आयसीएमआरला अहवाल पाठविला आहे. मी स्वत: तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. लवकरच आपल्याला मान्यताही मिळेल अशी अपेक्षा आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले.

विद्यापीठात पूर्वीपासून लॅब तयार होती. आयसीएमआर व एम्सच्या नियमानुसार येथील तज्ज्ञांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. ही लॅब सुरु होण्यास प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी अनेक दिवसांपासून याकरिता कठोर परिश्रम घेतले आहे. या महामारीला नियंत्रित करण्याकरिता ही चांगली सुविधा होईल, असे पालकमंत्री  ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

 

Leave a Comment