लॉकडाऊनमध्येही त्यांनी शोधला रोजगाराचा मार्ग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि २९ अहमदनगर वय वर्ष १८ पूर्ण झाल्याने अनाथ विद्यार्थ्यांना अनाथाश्रमाबाहेर पडावे लागते. अशा काही युवकांना रोजगार मिळावा, यासाठी ‘युवान’ ह्या सामाजिक संस्थेमार्फत क्रिसील रेच्या सहकार्याने ‘इको युवान’ हा ज्युट व कापडी पिशवी निर्मितीचा प्रकल्प ३ महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आला होता.

त्यासाठी आवश्यक अद्यावत प्रशिक्षण वंचित युवक- युवतींना देण्यात आले. प्रशिक्षणानंतर उच्च दर्जाच्या आकर्षक बॅग्ज विद्यार्थ्यांनी बनवायला सुरवात केली होती. युवान तर्फे सदर उत्पादन बाजारात आणले जाणार, तोच लॉकडाऊन जाहीर झाले. उत्पादन थांबले. भाड्याने घेतलेल्या जागेत उत्पादन सुरू असल्याने भाडे भरण्याचा प्रश्नही युवान समोर उभा राहिला.

उत्पादनाची विक्री करता येत नसल्याने उत्पन्नही नाही. अशा कात्रीत हा प्रकल्प सापडला. मधल्या काळात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना युवानतर्फे किराणा साहित्याचा आधार मिळाला. महिनाभरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन वाढला. अत्यावश्यक गोष्टींसाठी सामान्यांना घराबाहेर पडावेच लागते. दुकानदार, पोलीस, बँक, शासकिय कर्मचारी भाजीपाला विक्रेते, सामान्य नागरिक यांना मास्कची गरज भासते.

बाजारात उपलब्ध सर्जिकल मास्क केवळ काही तासच वापरता येतात. उघड्यावर ते सर्रास फेकले जातात. प्राण्यांनाही त्यामुळे संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सर्जिकल मास्कचे विघटन होत नसल्याने पर्यावरणाचेही मोठे नुकसान होते. बाजारातील सामान्यांसाठीच्या मास्कची कमतरता ओळखून सदयस्थितीत कापडी मास्कची निर्मिती करण्याचा निर्णय युवान मार्फत घेण्यात आला.

बॅग निर्मितीच्याच मशीन्स त्यासाठी सहज वापरात येणार होत्या. मालवाहतूक आणि दुकाने बंद असल्याने केवळ कच्च्या मालाचे आव्हान होते. त्यावरही स्वयंसेवकांच्या मदतीने मात करण्यात आली. फिजिकल डिस्टनसिंगचा नियम पाळण्यासाठी युवानमार्फत तीन वेग-वेगळ्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळातही आहे त्या संसाधनांचा आणि वेळेचा देशसेवेसाठी सदुपयोग करत *युवान* विद्यार्थ्यांनी आदर्श पायंडा पाडला आहे. सध्या विविध संस्था, संघटना यांसाठीच्या बल्क ऑर्डरवर कामास सुरवात करण्यात आली आहे. लॉकडाऊन नंतरही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे पुढील किमान १ /२ महिने हे काम चालूच राहिल.

आपणासही मास्क हवे असल्यास ९०११११८७८७ / ९८५०१९२३४५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन युवानमार्फत करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील गरजु कुटूंबांना दानशुरांच्या मदतीने युवानमार्फत मदतीचा हातही देण्यात येत आहे.

आजतागायत ५oo पेक्षा अधिक ग्रामीण भागातील गरजु कुटूंबांना युवानमार्फत मदतीचा हात देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हाभरातील युवान स्वयंसेवक आणि विद्यार्थी गरजुंसाठी धोका पत्करून मोठी मेहनत घेत आहेत. आपल्या एकत्रित प्रयत्नांतून आपण कोरोना या मानवनिर्मित आपत्तीवर निश्चितच मात करू.

Leave a Comment