शेतकऱ्यांना निविष्ठा वेळेत उपलब्ध करा – पालकमंत्री जयंत पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांगली : खरीप हंगामासाठी आवश्यक असणारी खते, बियाणे, किटकनाशके शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत.

यासाठीचे आवश्यक ते सर्व नियोजन कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी बोगस बियाणे, खते, किटकनाशके यांची विक्री होणार नाही, तसेच जादा दराने विक्री होणार नाही, कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याबाबतची आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन खरीप हंगाम यशस्वी करण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.

सांगली जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक पालकमंत्री जयंत पाटील यांनी एनआयसी कनेक्टीव्हीटीव्दारे घेतली. या बैठकीसाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशिल माने, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत,

आमदार अनिल बाबर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात खरीपासाठी ३ लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये भात, खरीप ज्वारी, मका, इतर तृणधान्ये असे एकूण तृणधान्याचे १ लाख ६१ हजार ३०० हेक्टर क्षेत्र आहे. तूर, मुग, उडीद व अन्य कडधान्याचे ४१ हजार ५०० हेक्टर, असे एकूण अन्नधान्याच्या पिकाखाली २ लाख २ हजार ८०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे.

तर भुईमुग, कारळा, सुर्यफूल, सोयाबीन व अन्य तेलबिया अशा ९३ हजार १०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यासाठी ५२ हजार ८५३ क्विंटल बियाणांची मागणी आहे. यामधील महाबीज व एनएससी कडून २१ हजार १४१ क्विंटलचा तर अन्य खाजगी कंपन्यांकडून ३१ हजार ७११ क्विंटल बियाणांच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये बियाणांची मागणी करत असताना मागील वर्षामध्ये अतिवृष्टी, महापूर व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांकडील सोयाबीन बाधित झाल्याने बियाणे म्हणून वापरण्यासाठी योग्य नसल्यामुळे महाबीजकडे ७ हजार ५८४ क्विंटलची वाढीव मागणी करण्यात आली आहे.

ज्या शेतकऱ्यांना स्वत:कडील सोयाबीन बियाणे वापरावयाचे आहे, त्यांच्यासाठी गावस्तरावर उगवण क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उगवण चाचणी घेतल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये मार्च २०२० अखेर एकूण २० हजार ८५३ मेट्रिक टन रायासनिक खतांचा साठा शिल्लक असून खरीप हंगामासाठी १ लाख २९ हजार १० मेट्रिक टन आवंटन मंजूर झाले आहे. तर एप्रिल अखेर ५३ हजार २८० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

सांगली जिल्ह्यामध्ये साधारणपणे २०६५ बियाणे, २७६८ खते व २३२० किटकनाशके परवानाधारकांच्या माध्यमातून कृषी निविष्ठांचा पुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना शेतीचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट होण्यासाठी गुणवत्तापूर्ण निविष्ठा वितरीत होण्याच्या दृष्टीकोनातून कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग असे एकूण ३२ गुणनियंत्रक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरीप हंगाम २०२०-२१ साठी गुणनियंत्रण नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यात ११ भरारी पथके स्थापन करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सर्व विक्री केंद्रांची तपासणी केली जाणार आहे.

एखाद्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत व्हावी व आलेल्या बिकट परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत व्हावी यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे क्लेम दोन-तीन वर्षे प्रलंबित राहिल्याचे दिसून येत आहे.

सदरची बाब अत्यंत चूकीची असून एखाद्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित गावच्या ग्रामसेवक व कृषी पर्यवेक्षकांनी संबंधितांच्या कुटुंबाकडून आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता करून घ्यावी व यंत्रणेने अशा शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूचे क्लेम विमा कंपन्यांकडून विहीत मुदतीत संबंधित कुटुंबाला मिळवून द्यावे.

यामध्ये कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुरूस्तीअभावी ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने गैरसोय होत असल्याची बाब अनेक लोकप्रतिनिधींनी यावेळी अधोरेखीत केली. यावर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता नादुरूस्त ट्रान्सफॉर्मरची तात्काळ दुरूस्त करावी व जिल्ह्यातील यंत्रणा सुरळीत ठेवावी.

प्रलंबित असणाऱ्या कृषी पंपांच्या जोडण्या तात्काळ द्याव्यात. याबरोबरच तक्रार आल्यापासून ट्रान्सफॉर्मर दुरूस्त होईपर्यंतची सर्व माहिती दरमहा जिल्हा प्रशासनाला द्यावी.

या बैठकीत त्यांनी द्राक्ष व डाळिंब पिकाच्या निर्यातीसाठी किटकनाशकांचे उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालाची आवश्यकता असते.

सदर अहवाल मिळण्यामध्ये वेळ जात असल्याने निर्यातीवर परिणाम होतो. त्यामुळे सांगली जिल्ह्यात अशी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रस्तावाचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पाठपुरावा करावा.

नुकत्याच झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे कृषी क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके (कृषी निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केल्याचे कृषी विभागामार्फत यावेळी सांगण्यात आले.

Leave a Comment