Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा पुढे ढकलल्या

लातूर, दि. ३० : कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उन्हाळी २०२० च्या परीक्षा घेण्यासंदर्भात गठीत केलेल्या समितीने तशी शिफारस केली असल्याची माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिली.

विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रा. डॉ. मोहन खामगावकर, प्रतिकुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली.

बैठकीत सर्व वैद्यकीय शाखांचे अधिष्ठाता तसेच केंद्रीय परिषदेचे सदस्य डॉ.  दर्शन दक्षिणदास, डॉ. कैलाश शर्मा व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एस.एस. सावरीकर सहभागी झाले होते.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर २०२० च्या परीक्षा पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात, या परिक्षांचे वेळापत्रक विद्यापीठांशी संलग्न असणाऱ्या प्रमुख संस्था, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांशी परामर्श करून घेण्यात

याव्यात तसेच परिक्षांचे अंतिम वेळापत्रक निश्चित करताना केंद्रीय परिषदांशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना परिक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा शिफारशी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या या परिक्षांच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच विद्यापीठांच्या कोणत्याही परिपत्रकाची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहिती ग्राह्य धरण्यात यावी,असे आवाहनही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.