Maharashtra

संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या ताकदीनं लढलो त्याच ताकदीने ‘कोरोना’विरुद्ध लढू व जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विश्वास

मुंबई, दि. ३० :- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्रानं ज्या ताकदीनं लढवला त्याच ताकदीनं आज ‘कोरोना’विरुद्ध लढू आणि जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रस्त्यावर उतरुन संघर्ष केला होता, यावेळी प्रत्येकानं आपापल्या घरातंच थांबूनंच कोरोनाविरुद्ध लढायचं आहे, कोरोनाला हरवायचं आहे. त्यासाठी घराबाहेर पडू नका, रस्त्यावर येऊ नका, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला केलं आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेशी संवाद साधताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणांचं बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात लढलेल्या, योगदान दिलेल्या राज्याच्या सुपुत्रांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा यंदा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन आहे.

हा दिनाचा सोहळा राज्यभर दिमाखदारपणे साजरा व्हावा असा आपला प्रयत्न, निर्धार, नियोजन होतं, परंतु कोरोना संकटामुळे गर्दी टाळायची आहे. त्यासाठी महाराष्ट्र दिनाचा सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत, मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे यंदा सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच महाराष्ट्र दिन साजरा करावा. घरी थांबावं लागत असलं तरी नागरिकांच्या आनंद, उत्साहात कुठलीही कमी असणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून राज्याच्या जडणघडणीत अनेकांचं योगदान राहिलं आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांपर्यंत सर्वांनीच महाराष्ट्राच्या प्रगतीत योगदान दिलं आहे.

राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, शिक्षक, व्यापारी, उद्योजक, पोलिस, सैनिक, डॉक्टर, इंजिनियर, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक, अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजचा महाराष्ट्र घडल्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सध्या राज्यावर कोरोनाचं महासंकट आहे. या संकटाचा मुकाबला आपले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, होमगार्ड, सफाई कामगार, महापालिका, नगरपालिकांचे कर्मचारी, आशा वर्कर, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा, औषध प्रशासन विभाग, अन्य स्थानिक स्वराज संस्थांचे, शासनाच्या अन्य विभागांचे अधिकारी, कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत.

जोखीम पत्करुन कर्तव्य पार पाडत असलेल्या या सर्वांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे. या कोरोना योद्ध्यांचं कार्य, त्याग महाराष्ट्र विसरणार नाही, असंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, खाजगी, स्वयंसेवी संस्था, व्यक्ती आपापल्या परीनं योगदान, सहभाग देत आहेत.  त्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले आहेत.

महाराष्ट्राचा इतिहास संघर्षाचा आहे. महाराष्ट्रानं प्रत्येक संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. 1967चा कोयना भूकंप, 1972चा दुष्काळ, 1993चा किल्लारी भूकंप, 2005ची अतिवृष्टी, महापूरासारख्या संकटांचा महाराष्ट्रानं यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्र कोरोनावरही लवकर विजय मिळवेल, असेही ते म्हणाले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशात पहिलं पाऊन महाराष्ट्रानं टाकलं. सार्वजनिक वाहतुकीवर बंदी, टाळेबंदीसारखे निर्णय महाराष्ट्रानं सर्वप्रथम घेतले. आर्थिक हानीचा विचार न करता नागरिकांचा जीव वाचवण्यास प्राधान्य दिलं.

आज परराज्यातील साडेसहा लाख मजूरांच्या निवास, भोजन, वैद्यकीय सेवेची व्यवस्था शासकीय यंत्रणांमार्फत केली जात आहे.  तितक्याच जणांची व्यवस्था खाजगी, स्वयंसेवी संस्थांकडून केली जात आहे. कोरोनाच्या संकटाविरोधात राज्याचं शासन, प्रशासन, संपूर्ण जनता आज एकजुटीनं लढत आहे, हे चित्र आशादायी आणि विजयाची खात्री देणारं असल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

टाळेबंदीचा निर्णय कटू, त्रासदायक असला तरी नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी तो आवश्यक होता, म्हणून घेण्यात आला आहे. राज्यातील जनतेनंही त्या निर्णयाला प्रतिसाद देत टाळेबंदीचं मनापासून पालन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

कोरोनाला हरवण्यासाठी त्याच्या प्रादुर्भावाची साखळी तोडणं हाच एकमेव उपाय असल्यानं टाळेबंदीचं पालन करा. कुणीही घराबाहेर पडू नका. बाहेर दबा धरुन बसलेल्या कोरोनाला स्वत:च्या घरात नेऊ नका. घरात रहा, सुरक्षित रहा. स्वत:ला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा, अशी आवाहनवजा विनंतीही उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

कोरोनावर प्रतिबंधक लस शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. महाराष्ट्रातही त्याचं संशोधन सुरु आहे. या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close