Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

बियाणे व खते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पुरविण्याचे नियोजन – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, दि. 1 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी शेतकरी गट/उत्पादक कंपन्यांमार्फत बी-बीयाणे व खते बांधापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना बीयाणे व खते वेळेवर या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असली तरी त्यांनी बागायती कापसाची लागवड 25 मे नंतरच करावी. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज तातडीने उपलबध करुन द्यावे. असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील,

जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषि अधिकारी वैभव शिंदे,

जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक अरुण प्रकाश, विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता श्री. शेख, जळगाव जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र देशमुख आदि उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी शक्यतो धुळ पेरणी करु नये तर बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी. निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील काळात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकविमा काढावा. त्याचबरोबर एकाच पिकावर विसंबून न राहता मुख्य पिकाबरोबर आतंरपीक व मिस्त्रपिक घ्यावे.

शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलल्या बीयाणे, खतांचे पक्के बील विक्रेत्याकडून घ्यावे. तसेच सदरचे बील हंगाम संपेपर्यंत सांभाळून ठेवावे. याशिवाय शेतकऱ्यांनी पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी गटशेतीचा अवलंब करावा असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात कापूस पिकाखालील लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायती कापूस पीकाची लागवड करताना शेतकऱ्यांना पीकाला पाणी देता यावे याकरीता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात आठवड्यातून किमान चार दिवस दिवसा वीज उपलब्ध करुन द्यावी. वीज वितरणाचे वेळापत्रक बदलण्यासाठी आवश्यकता भासल्यास उर्जामंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल

असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान तातडीने उपलब्ध होण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रयोगशाळा तयार कराव्यात. याशिवाय शेतकऱ्यांना लावगडीसाठी भांडवलाची आवश्यकता असते ही बाब लक्षात घेता बँकांनी लवकरात लवकर पीककर्जाचे वाटप करावे. जिल्ह्यातील लहान गावांमध्ये शक्यतो एकाच दिवशी पेरणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत. त्याचबरोबर पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होवू नये याकरीता गिरणाचे एक आर्वतर पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.

जिल्ह्यातील नागरीकांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता कृषि विभागाची जास्तीत जास्त कामे नरेगाच्या माध्यमातून करावीत. तसेच पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध आहेत.

एसएमएसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषि विषयक मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विभगाला या डाटाचा उपयोग करता येईल. जेणेकरुन शेतकऱ्यांपर्यंत चांगल माहिती पोहोचविणे शक्य होईल. अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ ढाकणे यांनी दिली. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत 64.66 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आल्याचे जितेंद्र देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान मिळावे याकरीता बालक ते पालक या तत्वानुसार मुलगा व वडील या दोघांनाही प्रशिक्षण देण्यासाठी जिल्ह्यात 1100 शेतीशाळा घेण्याचे कृषि विभागाचे नियोजन असून गटशेतीच्या माध्यमातून एक गट एक वाण हा उपक्रम राबविणार असल्याचे कृषि उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्यात 5 लक्ष 15 हजार बीटी बियाणे उपलब्ध असून 42 हजार मेट्रीक टन खते उपलब्ध आहेत. कोरोणा विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांनी थेट शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार आतापर्यंत सुमारे 17 हजार क्विंटल फळे व भाजीपाला विक्री करण्यात आला आहे.

जिल्ह्यात 10 हजार 834 शेतकऱ्यांना 10 कोटी 19 लाख रुपये पिकविमा संरक्षित रक्कम प्रदान करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी बैठकीत दिली.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी ते ग्राहक संकल्पनेनुसार जिल्ह्यातील विविध प्रकारचा शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.