Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

परराज्यातील, राज्यांतर्गत अडकलेल्यांना मूळ गावी जाण्यासाठीचे नियोजन सुरू

मुंबई, दि.1 : परराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले आहेत, त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे.

संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात  सुखरूप पाठवले जाईल व त्याचपद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, आणि राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनासुद्धा मूळ गावी पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात येत आहे अशी महिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

श्री. परब म्हणाले, या नागरिकांना मूळ गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे आणि  बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये ग्रुप लीडर च्या माध्यमातून नोंदणी करावी. नोंदणी करत असताना नाव, सध्या राहात असलेला पत्ता, कुठे जाणार आहे त्या ठिकाणाचा पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर यांची नोंद करावी.

आणि त्यांना बसने प्रवास करायचा आहे का रेल्वेने याचीही  नोंद त्यात करावी. जाणाऱ्या लोकांची संख्या  जर एक हजार असेल तर रेल्वेने प्रवासाची व्यवस्था आणि 25 संख्या असेल तर बसची प्रवासाची  व्यवस्था करण्यात येईल. तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांचे तपासणी प्रमाणपत्र सोबत देण्यात येईल.

राज्यांतर्गत अडकलेले लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र जर एखाद्या शहरात किंवा भागात कंटेटमेंट झोन,हॉटस्पॉट  जाहीर केला असेल तर त्यांना त्या ठिकाणाहून जाण्यासाठी परवानगी नाही.

प्रत्येक जिल्हा, तालुका पातळीवर यासाठी  नोडल ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याशी समन्वय साधून शासनामार्फत  शिस्तबद्ध व्यवस्था केली  जाईल. लोकांनी सहकार्य करावे, गर्दी  करू नये असे आवाहनही श्री. परब यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.