Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता

अमरावती : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी संशयितांचे अहवाल तत्काळ मिळावे व उपचार, उपाययोजनांना गती मिळावी यासाठी अमरावतीत लवकरात लवकर लॅब सुरू करण्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोना चाचणी लॅब कार्यान्वित करण्यास मान्यता मिळाली असून, सोमवारपर्यंत ही लॅब कार्यान्वित होईल, अशी माहिती पालकमंत्री ॲड.ठाकूर यांनी दिली.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने पाठवलेले मान्यतेचे पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले. त्यानुसार सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, केवळ लॉगीन आयडी मिळण्याची कार्यवाही बाकी आहे. त्याबाबतही पालकमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून, लवकरच ते प्राप्त होईल.

विद्यापीठात २ बॅचेस आहेत. एका बॅचमध्ये २४ स्वॅब काढता येतात. त्यानुसार सध्या ४८ चाचण्या दोन बॅचेसमध्ये होतील. अजून दोन बॅचेसला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. ते प्रशिक्षण लवकरच पूर्ण होऊन एकूण ९६ चाचण्या होऊ शकतील. या कार्यवाहीमुळे चाचणी अहवाल तत्काळ मिळण्यास मदत होणार आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्येही लॅब सुरु होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. तिथे यंत्रणाही लवकरात लवकर कार्यान्वित करून घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक लॅबलाही अशी सूचना करण्यात आली आहे. अशा प्रकारे २-३ लॅब अमरावतीत झाल्या तर संपूर्ण विभागाला त्याचा फायदा होईल. जेवढे जास्त स्वॅब तपासता येतील, तेवढी तपासणीची प्रक्रियाही जलद व व्यापक होते.

लॅबसाठी पीपीई कीट्स व इतर ज्या ज्या गोष्टी लागतील, त्या जिल्हा नियोजन निधीतून देण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

लॅब सुरू होण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न व सहभाग राहिला आहे. सगळ्यांच्या प्रयत्न, सहकार्य व एकजूटीतूनच आपण कोरोनाच्या महासंकटावर मात करू शकू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

सध्या अमरावती जिल्ह्यात संशयितांचे घेतलेले थ्रोट स्वॅब नागपूर, वर्धा व अकोला येथील प्रयोगशाळात तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. आता अमरावतीतच लॅब सुरू होत असल्यामुळे चाचणी अहवाल लवकर प्राप्त होऊन उपचार, इतरांची तपासणी व इतर उपाययोजना आदी प्रक्रियेला गती मिळेल व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याचा लाभ होईल.

पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी लॅब तत्काळ सुरू होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे प्रत्येक तांत्रिक बाबींची वेळेत कार्यवाही होऊन लॅब सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. अमरावतीत लॅब सुरू झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावी, जलद व व्यापक करणे शक्य होणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.