Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

मालेगाव कोरोनामुक्तीसाठी अकरा मोबाईल व्हॅन सज्ज : कृषीमंत्री दादाजी भुसे

मालेगाव : नॉन कोविड रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’, या संकल्पनेतून मालेगावकरांच्या सेवेत एकाचवेळी अकरा मोबाईल व्हॅन दाखल झाल्या आहेत.

या व्हॅनच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात जाऊन तेथील रुग्णांची त्याच ठिकाणी मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहेत.

या तपासणी मोहिमेत सारी व कोरोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर प्रथमोपचार करुन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याने, या अकरा मोबाईल व्हॅन कोरोनामुक्त मालेगाव करण्यात नक्कीच खारीचा वाटा उचलतील, असा विश्वास कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.

भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका व सर्व डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह, मालेगाव येथे ‘डॉक्टर आपल्या दारी’ या मोहिमेचा शुभारंभ मंत्री श्री.भुसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महापौर ताहेरा शेख, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी तथा घटना व्यवस्थापक डॉ.पंकज आशिया, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे,

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंग, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री.भुसे म्हणाले, मोबाईल व्हॅनची गरज ओळखून जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ही सेवा मालेगावकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.

प्रत्येक व्हॅनचे रिपोर्टिंग होणार असल्याने कोणकोणत्या भागात व किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, याचा अहवालही मिळणार आहे. यामध्ये सारी व कोरोना या आजारांची लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

शहरातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी चांगला उपक्रम : राजाराम माने

यावेळी बोलताना विभागीय आयुक्त श्री.माने म्हणाले, शहरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेत दाखल होणाऱ्या मोबाईल व्हॅनमुळे कोरोना आणि नॉन कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी या व्हॅन्सचा नक्कीच उपयोग होईल,  असा विश्वास विभागीय आयुक्त श्री.माने यांनी यावेळी व्यक्त केला.

कोविड व नॉन कोविड अशी दुहेरी आरोग्य सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार : सूरज मांढरे

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, मालेगाव मध्ये काम करताना एकीकडे कोरोनाशी लढा सुरु असताना नॉन कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती.

खाजगी डॉक्टरांची सुविधाही तोकडी पडत असल्याचे लक्षात आल्यावर बाहेरुन मदत घेणे गरजेचे होते. त्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या शांतीलाल मुथा यांच्याशी चर्चा करुन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला.

त्यांच्यासोबत आम्ही देखील १०८ रुग्णवहिकेच्या सेवेची मदत उपलब्ध करुन देणार आहोत. त्यामुळे कोविड व नॉन कोविड अशी दुहेरी आरोग्य सेवा या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याने यापुढे नॉन कोविड रुग्णांची हेळसांड होणार नाही.

असे जिल्हाधिकारी श्री.मांढरे यांनी यावेळी सांगितले.

सर्वप्रथम विभागीय आयुक्त राजाराम माने व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मन्सुरा हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मालेगाव पश्चिम भागात उभारण्यात आलेल्या नवीन रुग्णालये व क्वारंटाईन सेंटरची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर शासकीय विश्रामगृहात कृषी मंत्री दादाजी भुसे व विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या हस्ते पोलीस प्रशासनासह महानगरपालिका व इतर विभागांना सेवाभावी संस्थांच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.