Maharashtra

…आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

नंदुरबार, दि.4 : …जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण आणि वृद्ध व्यक्तीदेखील होते.

त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याकडे लक्ष देण्याची गरज असताना पोस्ट खाते मदतीला धावून आले आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.

कोविड-19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन अहोरात्र काम करत आहे. संपूर्ण देशभर लॉकडाउन सुरुच आहे.

कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रतिबंधीत क्षेत्रदेखील वाढते आहे. अशा परिस्थितीत अधिकारी, पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या लढाईमध्ये आपले मोलाचे योगदान देत आहेत.

या सर्व कोरोना योद्धासोबतीने पोस्टमन काम करीत आहे. सध्याच्या परिस्थितीत कौतुक करावे तेवढे कमी..

केंद्र सरकारने पोस्ट खात्याची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून सुरु ठेवल्याने देशातील सर्व पोस्टमन या लॉकडाउन काळामध्ये आपली सेवा देत आहेत.

नागरीकांचे स्पीड पोस्ट, रजिस्टर तसेच महत्त्वाचे टपाल, वृद्धांचे पेन्शन पेपर, पार्सल वितरण करणे, सरकारच्या विविध योजनांचे पैसे लाभार्थ्यांना घरपोच देणे, इत्यादी अत्यंत महत्त्वाची कामे पोस्टमन करीत आहेत.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गरजेची औषधे घरपोच पोहोचविण्याचे कामदेखील पोस्टमनमार्फत होत असल्याने अनेक वयोवृद्धांचे आशिर्वाद त्यांना मिळत आहेत.

देश आणि राज्याच्या विविध भागातून पार्सल नंदुरबार मध्ये वितरीत करण्यासाठी आली होती. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची औषधे होती. त्यामुळे ती त्वरीत पोहोचविणे निकडीचे होते.

धुळे डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांनी विशेष व्यवस्था करुन त्वरीत सदरची पार्सल नंदुरबार येथे पोहोच केली.

नंदुरबार मध्ये संचारबंदी असताना देखील पोस्टमास्तर भालचंद्र जोशी तसेच त्याचे सहकारी पोस्टमन सतीश शिंदे, सिद्धेश्वर माळी यांनी जीवाची पर्वा न करता त्वरीत सर्व औषध पार्सलचे वितरण ठराविक वेळेत केले.

लॉकडाउन मुळे औषधे वेळेत पोहोच होणार की नाहीत या चिंतेत असलेल्या रुग्णांना अचानक पोस्टमन औषधे घेऊन आल्याने झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे शिंदे सांगतात.

या संकटकाळी आपणही काहीतरी योगदान देऊ शकलो याचे समाधान या दोघांना आहे. यानिमित्ताने सामान्य माणसाचे पोस्टाशी असलेले जुने नाते आणखी घट्ट होण्यास मदत झाली आहे.

औषध आणि पेन्शनच्या रुपाने ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनात झालेली आनंदाची पेरणी निश्चितपणे प्रत्येक कोरोना योद्ध्याचा उत्साह वाढविणारी आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button