Maharashtra

धनंजय मुंडेंचे बीड जिल्ह्यासाठी मिशन १००% ग्रीन झोन!

बीड, दि. 4 : बीड जिल्हा केंद्र सरकारच्या निकषानुसार जरी सध्या ‘ऑरेंज झोन’ मध्ये असला तरी लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाला बीड जिल्ह्याच्या हद्दीपासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेला मदत करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या 550 होमगार्ड्सच्या पुनर्नियुक्तीचा प्रश्न श्री. मुंडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गी लावला. तसेच त्यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या ५% निधीतून व्यवस्था करण्यात येईल असेही श्री. मुंडे म्हणाले.

यावेळी जिल्ह्यात कमी पडणारे सोयाबीन चे बियाणे, लग्न लावण्यासाठी परवानगी, यांसह तूर व हरभरा खरेदीसाठी सध्या कमी असलेल्या ग्रेडरच्या उपलब्धीसंदर्भातही चर्चा झाली.

श्री. मुंडे यांनी एफसीआयच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क करून तूर व हरभरा खरेदीसाठी अधिकचे ४ ग्रेडर उपलब्ध करून दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडाऊन – तीन च्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला,

यावेळी जिल्ह्याला कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी लॉकडाऊन चे नियम आणखी कडक करावे लागले तरी हरकत नाही असेही श्री. मुंडे म्हणाले. यावेळी आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,

जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले, जिल्ह्यात 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे.  बदलत्या परिस्थितीत सर्व बाबींचा विचार करून पावले टाकली जात आहेत.

लोकांच्या अडचणी कमी व्हाव्यात व संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.

यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई किट देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

जिल्ह्यासाठी 9 हजार पीपीई किट उपलब्ध करून दिले आहेत व्हेंटिलेटर खरेदीतील अडचणी दूर होण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर सूचना देऊन तातडीने कार्यवाही करावी असे सांगितले.

याच बरोबर शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीने बांधावर डिझेल हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर बीड तालुक्यात सुरू करण्यात येत असून, सुरुवातीस असे एक सुसज्ज वाहन उपलब्ध करून दिले आहे.

यावर डिझेल वितरणाची मीटर, किंमत दर्शवणारी यंत्रणा असून इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्याने हे वाहन जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे.

यामुळे बीड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या डिझेल इंधनाचा प्रश्न त्यांच्या बांधावर सुटेल अशी आशा आहे.

बीड मधील इतर जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना बीडमध्ये येण्यास परवानगी दिली जात असल्याने पोलीस यंत्रणेवरील वाढणारा ताण लक्षात घेता

550 होमगार्ड जवानांची सेवा जिल्ह्यातील पोलीस विभागात मिळाव्या यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात आला आहे.

बाहेरच्या जिल्ह्यात अडकलेल्या लोकांना जिल्ह्यात येण्यासाठी परवानगी दिली जात असून याचा उपयोग तात्पुरत्या कारणांसाठी बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर अडकलेल्या व्यक्तींना व्हावा पण नोकरी व काम धंद्यानिमित्त इतर जिल्हा व शहरात राहणाऱ्यांनी बीड जिल्ह्यात येण्यासाठी याचा वापर करू नये.

पालकमंत्री श्री. मुंडे पुढे म्हणाले, संचार बंदीच्या काळात अकरा शहरातील नागरिकांना किराणा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने ‘निडली’ ॲप सुरू केले असून पुढे याद्वारे जीवनावश्यक वस्तू देखील लोकांना पोहोचविण्यासाठी सुविधा उपलब्ध केली जाईल.

याच बरोबर आढावा बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या कापूस खरेदी साठी जिल्ह्यातील तेरा जिनिंग केंद्र मध्ये सहा ग्रेडर उपलब्ध असल्याने, उद्यापर्यंत आणखी चार ग्रेडर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

तसेच खरिपाची तयारी करताना जिल्ह्यात 80 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याशी चर्चा करून सदर बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे.

विवाहाच्या  प्रसंगी 20 नातेवाईकांना उपस्थित राहण्यासाठी नियमात शिथिलता देण्यासाठी राज्यस्तरावरून निर्णय व्हावा  यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याशी चर्चा करून ना. मुंडे यांनी येत्या दोन दिवसात याबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री रेखावार यांनी  नागरिकांसाठी  पास उपलब्ध होणाऱ्या  ऑनलाइन प्रक्रियेद्वारे  आतापर्यंत  365 अर्ज  प्राप्त झाले असून  45 परवानगी दिली तसेच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी नवीन 30 व्हेंटिलेटर घेण्यात येत असल्याची  माहिती दिली गेल्याचे सांगितले .

बैठकीतूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना फोन

पालकमंत्री धनंजय मुंडे हे झटपट व जागच्या जागी निर्णय घेण्यासाठी प्रचंड लोकप्रिय आहेत. जिल्ह्यांमध्ये लग्न लावण्यासाठी परवानगी हा विषय निघताच त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन लावला वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे समजते.

होमगार्ड ची संख्या तसेच त्यांचे वेतन यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख त्याचबरोबर विविध आर्थिक नियोजनाच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्ह्यातील कमी पडणाऱ्या सोयाबीन बियाण्यांच्या बाबतीत कृषिमंत्री दादाजी भुसे आदी मान्यवरांना श्री. मुंडे यांनी चालू बैठकीतच फोन लावले व विषय मार्गी लावले.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button