Maharashtra

‘मौत के कुएँ मे हमारे लिए आकर ये लोग काम करते है!’

नंदुरबार, दि.6 : ‘ये डॉक्टर लोगोंकी बडी मेहेरबानी है, जान का खतरा होने के बावजूद ये लोग मौत के कुएँ मे हमारे लिए उतरते है’ अशा शब्दात कोविड-19 संसर्गमुक्त झालेल्या रुग्णाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

नंदुरबारच्या एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना उपचाराअंती त्यांचे शेवटचे दोन अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविण्यात आले. त्यात 71 वर्षाच्या वृद्ध महिलेनेदेखील कोविड-19 वर यशस्वीपणे मात केली आहे.

जिल्ह्यातील पहिल्या रुग्णाचा दुसरा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र त्याचा तिसरा आणि चौथा अहवाल निगेटीव्ह आला. त्याच्या कुटुंबातील इतर तिघांचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटीव्ह आला.

त्यामुळे चौघांना आज टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करीत घरी पाठविण्यात आले. जातांना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.के.डी.सातपुते, डॉ.राजेश वसावे,

डॉ.नरेंद्र खेडकर, तालुका वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी, अधिपरिचारिका निलीमा वळवी आणि जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ पासूनच जिल्हा रुग्णालय परिसरात उत्साहाचे वातावरण होते. विशेषत: परिचारिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. गेले चौदा दिवस त्यांनी धैर्यपूर्वक केलेल्या उपचारामुळे जिल्ह्यातील पहिला रुग्ण बरा होऊन घरी जाणार होता.

डॉ.भोये, डॉ.सातपुते आणि त्यांच्या टीमने 14 दिवस रुग्णांवर उत्तमरितीने उपचार केले. उपचारादरम्यान वृद्ध महिलेने जास्त विश्वासाने डॉक्टर आणि परिचारिकांना प्रतिसाद दिला, तसेच कुटुंबियांना धैर्य राखण्यास सांगितले.

आज चौघा रुग्णांना उत्साहात फुलांची उधळण करून निरोप देण्यात आला. फुलांची उधळण होत असताना वृद्ध आजींचे ‘हा बेटा हां,

सबके लिए दूवा है मेरी, सबका अच्छा होगा’ हे समाधानाचे शब्द रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम सार्थकी लावणारे होते. एका रुग्णवाहिकेतून चौघांना घरी पाठविण्यात आले.

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सर्व वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

आजच्या घटनेमुळे या आजारातून बरे होता येते हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण होऊन मनातली भीती कमी होईल. विश्वासाने आणि जिद्दीने उपचार करणाऱ्या जिल्हा रुग्णालयाच्या टीमचा जिल्हावासियांना अभिमान आहे,

अशा शब्दात पालकमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरीत रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

संसर्गमुक्त रुग्ण-जिल्हा रुग्णालयात चांगले उपचार होतात हे सिद्ध झाले आहे. जगात अनेक डॉक्टर आणि परिचारिकांना संसर्ग झाल्याचे माहित असताना डॉ.चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चांगले उपचार केले.

या सर्वांनी भावनीक आधार दिला. इथे माणूस कोण ते न पाहता केवळ रुग्ण म्हणून चांगली सेवा देत होते.

डॉ.राजेंद्र चौधरी, उपचार करणारे डॉक्टर-आजार नवीन असल्याने सुरूवातीस सर्व कर्मचाऱ्यांना भिती होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांची माहिती त्यांना दिली.

रुग्णांना धीर देण्यावर सर्वात जास्त भर दिला. हे एक टीमवर्क आहे. रुग्ण बरे झाले याचे समाधान आहेच, त्यापेक्षा जास्त इतरही रुग्णांना आम्ही बरे करू हा विश्वास मनात निर्माण झाला आहे.

गायत्री जोशी-दवे, परिचारिका – रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी त्यांच्याशी सतत संवाद साधला. उपचार करताना आम्हाला त्रास होतो हे जाणवू दिले नाही.

माणुसकीच्या नात्याने आणि कर्तव्य म्हणून प्रत्येकाने काम केले. हे आनंदाचे क्षण आहेत.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button