मुंबई उच्च न्यायालयाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी ५१ लाख रुपयांची मदत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. 6 : मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश,  मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, न्यायिक अधिकारी, न्यायपालिकेच्या अधिनस्त काम करणारे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीशांना, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत.

ठाणे जिल्हा सहकारी बँकेची 1 कोटी रुपयांची मदत

ठाणे जिल्हा सहकारी बँक लि.ने ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांनी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

ज्येष्ठ नागरिक श्री.चौधरी यांच्याकडून 50 हजार रुपयांची मदत

मी एक ज्येष्ठ नागरिक असून  मी आणि माझा परिवार घरातच राहातो, बाहेर पडत नाही, कोरोना विषाणूशी लढतांना सगळ्यांनी असंच  वागलं पाहिजे, शासनाला सहकार्य केलं पाहिजे.

आज राज्य आणि देश अडचणीत आहे, अशावेळी माझ्याकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून 50 हजार रुपयांची मदत मी मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19 खात्यात जमा करत आहे, मदतीचा खारीचा वाटा उचलत आहे

असे सांगून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 50 हजार रुपये जमा करणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे रविंद्र धनंजय चौधरी आणि त्यांचे वय वर्षे आहे  67. ते पुण्याच्या कोथरुड येथील राहणारे आहेत.

मुख्यमंत्र्यांनी श्री. चौधरी याना मनापासून धन्यवाद दिले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314 कोटी रुपये जमा

आतापर्यंत राज्यातील जनता, स्वंयसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी वर्ग, लहान बालके आणि कार्पोरेट हाऊसेस यांनी सगळ्यांनी मिळून केलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 314  कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.

दातृत्वाला मनापासून सलाम

कोरोनाशी लढतांना राज्यातील लहानथोर मंडळी शासनासमवेत मदतकार्यात उतरली असून या संकटाचा सामना करत आहेत.

श्री. चौधरी यांच्यासारखे ज्येष्ठ नागरिक असोत किंवा आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणारी राज्यातील बालके असोत,

शासनाला या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या सर्वांच्या दातृत्वाला मला मनापासून सलाम करावा वाटतो. या सर्वांच्या सहकार्याने,

स्वंयशिस्तीचे आणि नियमांचे कडक पालन करून आपण कोरोनाला नक्की हरवू, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment