श्रमिक ट्रेनला पालकमंत्र्यांनी दाखवली हिरवी झेंडी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वर्धा :  लॉकडाऊनमुळे वर्धा जिल्ह्यात बिहारमधील ७०० मजूर अडकले होते. या मजुरांना घेऊन जाणारी विशेष श्रमिक ट्रेन वर्धेतून पाठवण्यासाठी रवाना झाली. या ट्रेनमध्ये एकूण १ हजार १९ प्रवासी होते.

पालकमंत्री सुनील केदार,  खासदार रामदास तडस, आमदार रणजीत कांबळे  यांनी ट्रेनला हिरवी झेंडी दाखवून मजुरांना टाळ्यांच्या कडकडाटात  निरोप दिला.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी देशात व राज्यात लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक कामगार व इतर व्यक्ती  वर्धा जिल्ह्यात अडकले.

यातील अनेक मजूर कंपनी, जिनिंग मील, कृषी उत्पन्न बाजार समिती, रस्ता बांधकामावर काम करीत होते. कामे ठप्प झाल्यामुळे मजुरांची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून  संबंधित कंपन्यांनी व कंत्राटदारांनी केली होती.

राज्यात अडकलेल्या कामगारांना त्यांच्या स्व:गावी पोहचवण्याचा निर्णय झाल्यावर विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आल्या.

त्याच अनुषंगाने   वर्धेतील कामगारांना त्यांच्या स्वगृही  पोहचविण्यासाठी रेल्वे विभाग व विभागीय आयुक्तांशी संपर्क साधण्यात आला.

वर्धेत अडकलेल्या कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे ट्रेन वर्धेतून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सकाळी १० वाजता श्रमिक ट्रेन  नागपूरहून वर्धेत पोहचली.

वर्धा जिल्ह्याच्या वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा या तालुक्यातून एकूण ६७० कामगारांना विशेष बसने रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले.

हिंगणघाट १२७  यामध्ये ३ महिला,  सेलू १०३, वर्धा ११२, देवळी १०९, आर्वी १६४, कारंजा ३०,  समुद्रपूर २५ कामगारांचा समावेश होता. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातून ३४९  कामगारांना  वर्धा रेल्वे स्टेशनवर आणले.

एकूण १ हजार १९ कामगारांना, मास्क, पिण्याचे पाणी, फूड पॅकेट,  देण्यात आले.  तत्पूर्वी सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले होते.

दुपारी उन्हाची वेळ असल्यामुळे  प्रशासनाने रेल्वे स्थानकावर सावलीसाठी  मंडप व स्वागत कमान, रांगोळी रेखाटून मजुरांना प्रफुल्लीत वातावरणात निरोप दिला. सामाजिक अंतर राखत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जागेवर बसवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दक्षता घेतली.

यावेळी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी झेंडा दाखवून वर्धा रेल्वे स्थानकातून मजुरांना रवाना केले.

या वेळी पालकमंत्री सुनील केदार यांनी स्वगृही जाणाऱ्या मजुरांची आस्थेने चौकशी केली व तुमच्या घरी जाण्याच्या आनंदातच माझा आनंद आहे अशा भावना व्यक्त केल्या.

गाडीला हिरवी झेंडी दाखवताच गाडी प्लॅटफॉर्म वरून सुटली तेव्हा उपस्थित सर्वांनी जाणाऱ्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला.

तर प्रवाशांनी तेवढ्याच उत्साहात  टाळ्या वाजवून या निरोपाचा स्वीकार केला.  यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, पोलीस अधीक्षक बसवराज तेली,  मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, शेखर शेंडे, उपस्थित होते.

सर्व नियोजनासाठी जिल्हा प्रशासनाला अनेक संस्थांनी सहकार्य केले. यामध्ये  वैद्यकीय जनजागृती मंच यांनी फूड पॅकेट आणि पाणी  कँन, प्रवीण हिवरे पाणी बॉटल,

बसेस सचिन अग्निहोत्री, उत्तम गलवा, कलारंग ट्रॅव्हल्स, संत चावरा स्कुल, यांनी उपलब्ध करून दिल्यात.

लिक्विड सोप, पेपर सोप व मास्क मुरली केला व कृपलानी,  तसेच गर्दी नियंत्रण व इतर मदतीसाठी  माजी सैनिक संघटना, जिव्हाळा, प्रहार या संघटनांनी स्वयंसेवक दिलेत.

तसेच मजुरांच्या तिकिटाचे ६ लाख ४७ हजार ५०० रुपये  जिल्हा काँग्रेसने दिलेत. सर्व नियोजनामध्ये, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार, नितीन पाटील,

उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, चंद्रभान खंडाईत, हरीश धार्मिक, तहसीलदार प्रीती डुडुलकर, श्रीराम मुंदडा, राजू गणवीर, सचिन कुणावात, आशिष वानखडे यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment