Ahmednagarlive24.com
Breaking News Updates of Ahmednagar

बिहारचे बाराशे प्रवासी विशेष रेल्वेने स्वगृही रवाना

अलिबाग, दि.6  : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यात अडकलेल्या बिहार राज्यातील तब्बल 1 हजार 200 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने बिहारमधील दानापूर येथे पाठविण्यात आले.

तब्बल 43 दिवसांनी स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या गावाकडे, स्वत:च्या घरी जायला मिळत असल्याने या सर्वांनी भारत सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेश शासन आणि प्रशासनाला भरभरुन धन्यवाद दिले.

यावेळी पोलीस उपायुक्त अशोक दुधे, पंकज दहाणे, प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र गिद्दे, तहसिलदार अमित सानप आदी उपस्थित होते.

कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार येथील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते. तसे ते रायगड जिल्ह्यातही अडकले होते.

शासन आणि जिल्हा प्रशासन या मजुरांची व्यवस्थित काळजीही घेत होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरु लागल्याने रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे

, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले.  तसेच विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्य प्रदेश,

बिहार, गुजरात, राजस्थान, झारखंड, ओडिसा या राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून पुढील समन्वयाबाबतचे नियोजन केले आहे. अशाच प्रकारे मध्यप्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान,

झारखंड, ओडिसा या राज्यातील रायगड जिल्ह्यात अडकलेले मजूर/व्यक्ती यांना त्यांच्या राज्यातील स्वगृही पाठविण्यात येणार आहे.

पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी  आज या रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना  सुखरुप आपल्या गावाकडे जात असल्याबद्दल आणि कुटुंबाशी भेटण्याचा आनंद मिळणार असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यात अडकलेल्या सर्वांची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी शासनाने व प्रशासनाने देखील बिहार प्रशासनाशी उत्तम समन्वय साधला.

बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना सुखरूप जाता यावे आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित गावी येता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.

रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर/व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून बिहार येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले आहे.

रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने  रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांचे व्यवस्थित नियोजन केले.

यावेळी उपस्थित सर्वांकडूनच सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन करीत अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने या प्रवाशांना रेल्वेत सुखरुप बसविण्यात आले.

रेल्वे विभागानेदेखील रेल्वेगाडी सॅनिटाईझ करणे व रेल्वे स्थानकावर निर्जंतुकीकरण फवारणीची उत्तम व्यवस्था केली होती. प्रवाशांना मास्कचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले.

गावी जायला मिळत असल्याने या सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान होते, ओढ होती. शेवटी रेल्वे निघतानाही या प्रवाशांनी महाराष्ट्र शासनाचे, प्रशासनाचे, रेल्वे स्टेशनवर उपस्थित प्रत्येकाचे मन:पर्वूक आभार मानले.

Get real time updates directly on you device, subscribe now.