६८६ मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे नागभीडमध्ये दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चंद्रपूर, दि. 8 मे: लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात अडकलेल्या चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील 686 मजुरांना घेऊन श्रमिक रेल्वे आज सकाळी 9 वाजता नागभिड येथे पोहोचली.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी याठिकाणी 25 एसटी बसेस उपलब्ध करून  या मजुरांना आपापल्या गावाकडे मोफत जाण्याची व्यवस्था केली.

चंद्रपूर जिल्ह्यात ही दुसरी रेल्वे कालपासून आंध्र प्रदेश व तेलंगणातून पोहोचली आहे.

राज्य व राज्य बाहेर अडकून पडलेल्या नागरिकांना एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देण्याबाबत  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी स्पष्ट केले होते.

आज जिल्ह्यात आलेल्या 686 मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी मजुरांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी व्यवस्था केली.

या सर्व नागरिकांना शारीरिक अंतर राखण्याच्या अटीसह 25 एसटी बसने रवाना करण्यात आले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच शासकीय एसटी बसेस याठिकाणी उपलब्ध झाल्या.

यावेळी मजुरांना  फुड पॅकेट, मास्क, सॅनीटायझर, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. सकाळी 9 वाजता शासन-प्रशासन यांच्यावतीने करण्यात आलेल्या या सुविधांबद्दल गेल्या 40 दिवसांपासून लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांनी समाधान व्यक्त केले.

आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यात मोठ्या संख्येने चंद्रपूरचे मजूर कामानिमित्ताने गेले होते. परंतु,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉकडाऊन केले असल्यामुळे अनेक मजूर अडकलेले होते.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सध्या  मजुरांना स्वगृही आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मोठी मोहीम राबविली जात आहे.

यापूर्वीही चंद्रपूरच्या सीमेवरील लक्कडकोट व खांबाळा या ठिकाणावरून जवळपास 20 हजार मजूर आपापल्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था केली होती.

आता या कामी मदत व पुनर्वसन मंत्रालयामार्फत एसटी बसेसची उपलब्धता करून देण्यात येत आहे. आज झालेल्या मजुरांमध्ये चंद्रपूर ,गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यातील श्रमिकांचा प्रामुख्याने समावेश होता.

तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून प्रामुख्याने बल्लारपूर, कोरपना, पोंभुर्णा, सावली, नागभीड, चिमूर, जिवती, गोंडपिंपरी, मुल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी  या तालुक्यासह जिल्ह्यातील एकूण 510, तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी,

एटापल्ली, अहेरी,मुलचेरा, चामोर्शी भागातील 95 तर गोंदिया जिल्ह्यातील 64, नागपूर, सातारा या जिल्ह्यातील काही असे एकूण 686 मजुर नागभीड येथे आले होते.

नागभीड येथील रेल्वे स्थानकावर पोलीस प्रशासनामार्फत सुरक्षा व्यवस्था तसेच आरोग्य विभागाचे विशेष पथके  पूर्णवेळ सज्ज होते.

यावेळी मजुरांची नोंदणी, थर्मल स्क्रीनिंग,तपासणी व समुपदेशन करून त्यांना होम क्वॉरेन्टाइनचा शिक्का मारूनच त्यांना स्वगावी पाठविण्यात आले. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी अॅम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

जिल्ह्यामध्ये परत आलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी करून त्यांना 14 दिवस होम कॉरेन्टाईन राहावे लागणार आहे.

यावेळी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नागभीडचे तहसीलदार मनोहर चव्हाण, ब्रह्मपुरीचे तहसीलदार विजय पवार, नगरपरिषद नागभिडचे  मुख्याधिकारी मंगेश खवले

तसेच राज्य व रेल्वे पोलीस अधिकारी तर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment