लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अडकलेले ४ हजार ३९३ जण रवाना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यवतमाळ, दि.8 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव इतर ठिकाणी पसरू नये तसेच या संसर्गाची मानवी साखळी तोडण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केले.

त्यामुळे इतर राज्यातील, जिल्ह्यातील नागरिक, कामगार, विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यात तर यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून पडले.

मात्र आता अडकेलेल्या नागरिकांना आपापल्या जिल्ह्यात, राज्यात जाण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील विविध तालुक्यात अडकलेल्या 4393 जणांना त्यांच्या राज्यात  जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे. तर बाहेरून स्वगृही म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात परतणाऱ्यांची संख्या 3130 आहे.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होताच शासनाने विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांच्या परतीचा मार्ग मोकळा केला.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनीसुद्धा इतर राज्यांचे सचिव, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अडकलेले नागरिक आता स्वगृही जात आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात यायचे असेल तर ज्या जिल्ह्यातून यायचे आहे

त्या ठिकाणाहून covid१९.mhpolice.in या संकेतस्थळावर संबंधितांनी ऑनलाईन अर्ज सादर करावा. त्यानंतर येथील जिल्हा प्रशासनाद्वारे येण्याची परवानगी दिली जाते.

जिल्ह्यात परत येणाऱ्यांची तालुकास्तरीय समितीमार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. आपल्या जिल्ह्यातून इतर ठिकाणी जाण्यासाठीसुध्दा हीच प्रक्रिया आहे.

आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातून 4393 जण इतर जिल्ह्यात व इतर राज्यात रवाना करण्यात आले आहे. यात महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाणाऱ्यांची संख्या 3228 तर इतर राज्यात जाणाऱ्यांची संख्या 1165 आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना जिल्ह्याच्या 16 तालुक्यातून महाराष्ट्राच्या 28 जिल्ह्यात रवाना करण्यात आले आहे.

यात यवतमाळ तालुक्यातून सर्वाधिक 1331 जण, त्यानंतर पुसद तालुक्यातून 446 जण, वणी तालुक्यातून 206 जण व इतर तालुक्यातून जाणाऱ्यांचा समावेश आहे.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातून 13 राज्यातील 1165 अडकलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने त्यांच्या गृह राज्यात पाठविले आहे.

यात सर्वाधिक 722 जण बिहारमध्ये, त्यानंतर 380 जण मध्यप्रदेशात, 246 जण उत्तर प्रदेशात तसेच त्या-त्या संबंधित राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहे.

इतर राज्यातील नागरिकांसाठी अकोला आणि अमरावती येथून रेल्वे उपलब्ध होत असून त्यांना पाठविणे सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे इतर राज्यात व महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात अडकलेले 3130 नागरिक आपल्या जिल्ह्यात स्वगृही परतले आहेत. यात राज्याच्या इतर जिल्ह्यातून येणाऱ्यांची संख्या 2191 असून बाहेरच्या राज्यातून येणा-यांची संख्या 939 आहे.

इतर राज्यातून येणा-यांपैकी सर्वाधिक गुजरातवरून 501, त्यानंतर तेलंगणाहून 377 जण आहेत. आपल्या जिल्ह्यात दहा राज्यातून यवतमाळकर परत आले आहेत.

Leave a Comment