Maharashtra

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘स्नेह सेतू’ चा आधार

मुंबई, दि. ८ : कोरोना संकटाच्या या गंभीर परिस्थितीत राज्यातील शासकीय आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी दूरध्वनीद्वारे स्नेहाचा संवाद साधून आपुलकीची भावना प्रस्थापित करण्याचे कार्य ‘स्नेह सेतू’ या उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या संकल्पनेतून साझा संस्थेच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा आणि आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी यांच्यासह ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर येथील अपर आयुक्तांच्या उपस्थितीत वेबिनारच्या माध्यमातून  या उपक्रमाला सुरुवात झाली.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरु असणाऱ्या लॉकडाऊनमुळे आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी आपल्या घरी आहेत.

या काळात उदरनिर्वाहाचे साधन बंद असल्याने या विद्यार्थ्यांचे पालक घरीच आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत पालकांनी खचून न जाता धीराने सामोरे जायला हवे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागातर्फे हा ‘स्नेह सेतू’ उपक्रम आजपासून संपूर्ण राज्यभरात राबविण्यास सुरुवात केली आहे.

‘जोडूया पालकांशी जिव्हाळ्याचे नाते’ हे बोधवाक्य अनुसरून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमाद्वारे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला जाणार आहे.

या सर्व शाळांमधून स्वतःहून स्वयंसेवक म्हणून पुढे आलेले शिक्षक/ शिक्षिका व अधीक्षक / अधिक्षिका असा १०४ जणांचा समूह या पालकांशी ‘सुपर रिसेप्शनिस्ट’ या ॲप्लीकेशनच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

या उपक्रमाच्या माध्यमातून साधल्या जाणाऱ्या संवादाद्वारे पालकांचे  रोजचे काम, निरनिराळया जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता, गावात रोजगार हमी आवश्यकता, शिधापत्रिका तसेच अन्य लाभांची सद्यपरिस्थिती, मुलांचा अभ्यास, त्यांचे रोजचे दिनक्रम याविषयी आढावा घेण्यात येणार आहे.

तसेच कोरोनापासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी, कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर तो रोखण्यासाठी काय करायला हवे यासारख्या इतर विविध गोष्टींवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी पालकांशी संवाद साधण्याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यासाठी साझा संस्थेचे सहकार्य मिळत आहे. कोरोनाच्या या संकटमय  परिस्थितीत पालकांशी संवाद साधून त्यांच्याशी भावनिक नाते तयार करण्याच्या उद्दिष्टाने ‘स्नेह सेतू’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

पालकांशी संवाद साधल्यानंतर घेतलेली संपूर्ण माहिती स्वयंसेवक हे एका गुगल परिशिष्टात समाविष्ट करणार आहेत. या सर्व निरीक्षणावरून विभागाला भविष्यात आदिवासींसाठी विविध योजना तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

उपक्रमाद्वारे शासकीय योजनांचीही दिली जाणार माहिती

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नये याकरिता केंद्र व राज्य शासनाकडून लाभार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती ‘स्नेह सेतू’ या उपक्रमाच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधताना देण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया –

“राज्यातील सर्व आदिवासी हे आपल्या कुटुंबातील एक घटक आहेत. आणि सध्याच्या या कोरोना संकटाच्या काळात आपल्या कुटुंबातील अगदी महत्त्वाचा घटक असणाऱ्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी आपुलकीने संवाद साधून त्यांची विचारपूस करणे हे कुटुंबप्रमुख म्हणून आपले कर्तव्य आहे आणि हेच कर्तव्य या ‘स्नेह सेतू’ उपक्रमाद्वारे पार पाडले जात आहे” – आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा

लॉकडाऊनमुळे आश्रमशाळेतून घरी गेलेल्या विद्यार्थ्यांशी आपुलकीचा संवाद साधणे, या विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलून या कठीण काळात आदिवासी विकास विभाग त्यांच्यासोबत आहे हा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

‘स्नेह सेतू’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांशी भावनिक संवाद साधत त्यांच्या समस्याही जाणून घेता येणार आहेत.

या संवादातून आलेल्या निरीक्षणानुसार आदिवासी विकास विभागाला विविध योजना आखणीसाठी मदत होणार आहे – ॲड. के.सी. पाडवी, मंत्री, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button